तळेगाव दाभाडे पालिकेचा जेसीबी जळून खाक, अज्ञाताने लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 09:55 AM2024-01-10T09:55:39+5:302024-01-10T10:00:02+5:30
जेसीबी जळाल्याची दुर्घटना घडली, त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होता, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे....
तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा जेसीबी जळून खाक झाला. ही दुर्घटना कचरा डेपो (मोरखळा) येथे मंगळवारी (दि. ९) पहाटे घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने हा जेसीबी अशोक इंटरप्रायजेस या ठेकेदार एजन्सीकडे भाडेतत्त्वावर दिला होता. अज्ञाताने कचऱ्यास आग लावल्याने जेसीबी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जेसीबी जळाल्याची दुर्घटना घडली, त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होता, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून हा जेसीबी कचरा डेपो येथे होता. सोमवारी सायंकाळी काम उरकल्यानंतर चालकाने जेसीबी कचरा डेपोमध्ये नेहमीच्या ठिकाणी लावला. आगीच्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना दिली. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली; मात्र आगीचे कारण अनुत्तरित आहे. दरम्यान, यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.