महापालिका कर्मचाऱ्यांना जीन्स-टी-शर्ट बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:23+5:302021-02-11T04:12:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले, चित्रे असलेले कपडे परिधान करून कामावर येऊ नये, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले, चित्रे असलेले कपडे परिधान करून कामावर येऊ नये, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. “पुणे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून महापालिकेचे सर्व प्रकारचे अधिकारी, कर्मचारी यांनी वेशभूषेबद्दल जागरुक राहावे. आपली वेशभूषा शासकीय कार्यालयास अनुरूप ठरेल याची काळजी घेणे अभिप्रेत आहे,” असे सुनावण्यात आले आहे.
यापुढे महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना जीन्स व टी-शर्ट परिधान करून कामावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही साडी, सलवार-कुर्ता परिधान करूनच कामावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादीचे कपडे परिधान करण्याची सूचना करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश बुधवारी (दि.१०) काढले. या आदेशांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रत्येक खातेप्रमुख, विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. वेशभूषेचे नियम महापालिकेच्या नियमित सेवकांसह, कंत्राटी कामगार, व्यावसायिक सल्लागार यांच्यासाठीही कार्यालयीन वेळेत लागू करण्यात आले आहेत.
“पुणे महापालिकेत दररोज लोकप्रतिनिधी, विविध संस्थाचे प्रतिनिधी, उच्च पदस्थ अधिकारी व सर्व सामान्य नागरिक येत असतात. अशावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधतात. अशावेळी त्यांची वेशभूषा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून पहिला जातो. तर संबंधिताच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची छाप भेट देणाऱ्या व्यक्तीवर पडत असते. यामुळे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या व्यक्तीला सामोरे जाताना, आपली वेशभूषा किमान शासकीय कामास शोभेल अशी असेल याची सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
पुरुषांसाठी वेशभूषा
आवश्यक : शर्ट, पॅन्ट / ट्राऊझर, बूट, सँडल
मनाई : जीन्स, टी शर्ट, स्लीपर
चौकट
महिला सेवकांसाठी वेशभूषा
आवश्यक : साडी, सलवार-कुर्ता, ट्राऊझर-पॅन्ट व त्यावर कुर्ता किंवा शर्ट
मनाई : अन्य फॅशनेबल पेहराव, चित्रविचित्र नक्षीकाम व चित्रे असलेला वेष, स्लीपर
चौकट
ओळखपत्र अनिवार्य
-कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेशभूषेच्या दर्शनी भागावर ओळखपत्र धारण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
---------