जेईईमध्ये पुण्याचा राज अगरवाल देशात टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:33 AM2019-01-20T06:33:44+5:302019-01-20T06:34:33+5:30
आयआयटी, एनआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी ८ ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला
पुणे : आयआयटी, एनआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी ८ ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, पुण्याचा राज आर्यन अगरवाल देशात टॉपर ठरला आहे. राज्यातील अंकितकुमार मिश्रा व कार्तिक चंद्रेश गुप्त यांनी १०० पर्सेन्टाइल मिळवून पहिल्या पंधरामध्ये स्थान मिळविले.
राज हा पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आहे. या परीक्षेसाठी रोज चार तास अभ्यास केला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यात १०० व गणितामध्ये ९९ गुण मिळाल्याचे तो म्हणाला.
यंदा वर्षातून दोन वेळा परीक्षा घेऊन गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पर्सेन्टाइल देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना तिन्ही विषयांत मिळालेल्या गुणांच्या आधारे हे पर्सेन्टाइल ठरते. एप्रिलमध्ये आणखी एक जेईई परीक्षा होणार आहे. दोन्ही पैकी ज्या परीक्षेत चांगले पर्सेन्टाइल मिळाले आहेत, त्यानुसार विद्यार्थ्याची रँक निश्चित केली जाणार आहे.