Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 03:29 PM2023-05-26T15:29:50+5:302023-05-26T15:30:28+5:30
देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी ग्रामस्थांची मागणी
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तपदांची नुकतीच नियुक्ती झाली. यात ७ पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड करण्यात आली, तर सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमण्यात आले. या निवडीबाबत जेजुरीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. ग्रामस्थांच्या भावना सर्वप्रथम दैनिक लोकमत ने व्यक्त केल्या होत्या. ग्रामस्थांच्या तीव्र भावना आज ही व्यक्त होत आहेत.
नवीन विश्वस्त निवडीच्या निषेधार्थ जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने आज शुक्रवार( दि २६) पासून विविध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरु होती. या विश्वस्त पदावर देवाची महती, देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केले. यात बाहेरील गावातील सहा व केवळ एकच स्थानिक विश्वत निवडला गेला.
बाहेरील विश्वस्त नियुक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी( दि २५) रोजी ग्रामस्थांची येथील ऐतिहासिक छत्री मंदिर प्रांगणात बैठक होवून यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यांनतर जेजुरी शहरातून मोर्चा काढण्यात आला.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी निषेध व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या. त्यांनतर श्री मार्तंड देवसंस्थानच्या मल्हार भक्त निवासासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आले. या आंदोलनात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पालखी सोहळा समिती, आजीमाजी विश्वस्त, नगरसेवक व मोठ्या संख्यने ग्रामस्थ सहभागी होत मार्तंड देव संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना निवडी चा निषेध करून आंदोलनाबाबत लेखी निवेदन दिले आहे.