जेजुरी बसस्थानक बनले समस्यांचे आगार
By admin | Published: April 26, 2017 02:51 AM2017-04-26T02:51:31+5:302017-04-26T02:51:31+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरी येथील एसटी बसस्थानकावर असुविधांबरोबरच अस्वच्छता आणि दुर्गंधी नित्याचीच बाब बनली आहे.
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथील एसटी बसस्थानकावर असुविधांबरोबरच अस्वच्छता आणि दुर्गंधी नित्याचीच बाब बनली आहे. बसस्थानकात मूलभूत सुविधांची वानवा असल्याने देशभरातून खंडोबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत एसटी बसस्थनाकात प्रवाशांसाठी असुविधाच असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीच जास्त आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुमारे ३ एकर क्षेत्रफळाचे हे बसस्थानक असून त्याची उभारणी ४३ वर्षांपूर्वी सन १९७४ साली झालेली आहे. येथून दररोज पुण्याला ३१० जाणाऱ्या व ३२० येणाऱ्या अशा बसेस ये-जा करतात. दररोज सुमारे ६ हजार ५०० प्रवासी येथे चढतात-उतरतात. रविवारी सर्वाधिक गर्दी असते. ६० जास्तीच्या गाड्या रविवारी सोडण्यात येतात. यात सुमारे ४५०० प्रवासी प्रवास करतात. यात्राकाळात ही संख्या जास्त असते. बसही ७५ ने वाढतात, अशी माहिती बसस्थानक प्रमुख एस. एस. जोशी आणि एस. एस. जगताप यांनी दिली. बसस्थानकांच्या सोयी सुविधांबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या बसस्थानकाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे. जीर्ण झालेली इमारत, पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. उपहारगृह आहे पण ते कायमच बंद असते. प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. एक स्वच्छतागृह आहे ते बीओटी तत्त्वावर चालवण्यास दिलेले आहे. त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेसाठी एकच सफाई कामगार आहे आणि एक सुरक्षा कर्मचारी आहे. यांच्यावरच हे सर्व अवलंबून आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने वर्दळ जास्त आहे. यामुळे अस्वच्छता दिसते. सुलभ शौचालय मात्र खासगी ठेकेदार कंपनीला बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्त्वावर चालवायला दिलेले आहे, असे असतानाही स्थानक परिसर अस्वच्छ आहे. संपूर्ण इमारत जीर्ण झालेली असून भिंतींनाही तडे गेलेले आहेत. आतील स्वच्छतागृहे ही बंद आहेत. पुरुषांसाठी १० स्वछतागृहे व २ स्नानगृहे आहेत. महिलांसाठी ४ स्वच्छतागृहे असून याही स्वच्छतागृहांची अवस्था ही अत्यंत दयनीय स्वरूपाची आहे. येथे एवढ्या असुविधा असूनही येथे अंघोळीसाठी २० रुपये आणि स्वच्छतागृहासाठी ७ रुपये आकारले जातात. तेही नियमापेक्षा जास्तच आकारले जात आहे. पाण्याचीही व्यवस्था नाही. पाणीपुरवठा ही व्यवस्थित नसल्याने स्वच्छतागृहे ही दुर्गंधीयुक्त बनले आहेत. या संदर्भात शौचालयातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्याच्याकडून काहीच माहिती मिळू शकलेली नाही. सुलभ शौचालयाचा ठेकेदार तर इकडे कधी फिरकतही नसल्याचे समजते.
बसस्थानकातील उपहारगृह कित्येक वर्षांपासून बंद आहे. उपहारगृहचालक सोडून गेला आहे. नवीन चालक येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचे समजते. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानक सर्व सुविधांयुक्त असणे गरजेचे आहे. त्यासाठी जागाही खूप मोठी आहे. मात्र एसटी महामंडळाला याकडे लक्ष द्यायला वेळच नसावी. यामुळे प्रवाशांतून मोठी नाराजी आहे. दीड वर्षांपूर्वी जेजुरीतील नागरिकांनी व काही नगरसेवकांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन बसस्थानकात असलेल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या होत्या. स्थानकात रात्रीच्या वेळी रखवालदाराचा अभाव, घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांची दुरवस्था, स्नानगृहांची आवश्यकता, बसस्थानक आवाराचा परिसर दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची गर्दी, मुक्कामी गाडी नसणे. पुणे येथे सकाळच्या वेळी जाणाऱ्या ग्रामस्थांना-विद्यार्थ्यांना वेळेत गाडी नसल्याने उद्भवणारी समस्या आदींबाबत माहिती नामदार दिवाकर रावते यांना देण्यात आली.