जेजुरी गडकोटाची पडझड! २५० वर्षांत जीर्णोद्धार नाहीच : नंदी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:58 PM2018-08-24T23:58:42+5:302018-08-24T23:59:13+5:30
गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते.
जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे तीर्थक्षेत्र जेजुरी, कुलदैवताच्या गडकोटाची दुरवस्था होऊ लागली आहे. ९व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत खंडोबाच्या गडकोटाची उभारणी झाल्याचे निदर्शनास येते. मात्र, त्यानंतर गेल्या २५० वर्षांत गडकोटाची दुरुस्ती, डागडुजी झालेलीच नाही.
संपूर्ण गडकोटाची पाहणी केली असता पायथ्याच्या नंदी चौकापासून अगदी मुख्य गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज असल्याचे दिसते.
गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते. यातील अनेक दीपमाळा नामशेष झालेल्या आहेत. आज ज्या काही उभ्या दीपमाळा आहेत त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. गडकोटात ही मंदिरासमोरील चार आणि परिसरातील दोन दीपमाळा ही आता दुरुस्तीला आलेल्या आहेत. मंदिरासमोरील दीपमाळांवर दीप लावण्यासाठी घमेले ठेवावे लागते, अशीच परिस्थिती आहे.
गडकोटातील नगारखान्याच्या ओवºयांचा स्लॅब निखळण्याच्या स्थितीत आहे. गडकोटाची दक्षिण बाजूच्या तटबंदीच्या दगडांनी ही जागा सोडलेली आहे. त्याची दुरुस्ती किंवा दर्जा भराव्या लागणार आहेत. दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी पाहता मुख्य गाभाºयात हवा खेळती ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेचीही गरज आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत गडकोटावर पोहोचण्यासाठी एखादा मार्ग असणे तेवढेच महत्त्वाचे बनलेले आहे.
यासंदर्भात विश्वस्त संदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. गेल्या अडीचशे वर्षांपासून गडकोटाचा जीर्णोद्धार झालेला नसल्याने आज गडाची दुरवस्था दिसत असल्याचे सांगितले. मागील काही विश्वस्त मंडळाने किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत. गडकोट हा पुरातत्त्व विभागाच्या अख्यत्यारीत येत असल्याने गडाच्या कोणत्याही दुरुस्त्या करता येत नसल्याचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले. यासाठी विश्वस्त मंडळाकडून पुरातत्त्व विभागाशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरातत्त्व विभागाने याबाबतांभीर्याने विचार करणे आता गरजेचे बनले आहे; अन्यथा भविष्य कदाचित कोणालाच माफ करणार नाही, अशी चर्चा मात्र भाविकांतून होत आहे.