जेजुरी नगरपालिका कंत्राटी कामगारांचे उपोषण
By Admin | Published: May 5, 2017 02:05 AM2017-05-05T02:05:45+5:302017-05-05T02:05:45+5:30
जेजुरी नगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे ४५ ते ५० सफाई कर्मचाऱ्यांनी विविध
जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे ४५ ते ५० सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्यासह नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत मजदूर संघाच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
गेल्या २० ते २५ वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीने सलगपणे शहराची साफसफाई करणाऱ्या कामगारांना कामावर न घेतल्याच्या निषेधार्थ आरोग्य विभागातील सफाई कामगार विशेषत: महिला कामगारांनी काल बुधवार (दि. ३) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावर्षी नगरपालिकेकडून अथर्व एंटरप्रायझेस, वाई यांना ठेका देण्यात आला आहे. यामध्ये पाणीपुरवठा, कार्यालय (आस्थापना) वीज, अग्निशामक, आरोग्य साफसफाई आदी कामांसाठी हा ठेका आहे. ठेका घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काही सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असल्याची उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.
कंत्राटी पद्धतीने असले तरी गेल्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे. सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे,सर्वांना किमान वेतनासह वेतनचिठ्ठी ,पगारी सुट्या मिळाव्यात. सुरक्षिततेचे सर्व साधन कामगारांना मिळावे, आदी मागण्या करीत सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील महिन्यात मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्याशी याबाबत चर्चा करूनही मार्ग निघाला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा, लाइट, अग्निशामक व कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी व्यवस्थितरीत्या कार्यरत असल्याने व्यवस्थापकाने सांगितले. कंत्राटी कामगारांच्या उपोषणाबाबत मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्याकडून माहिती घेतली असता ठेकेदार, संबंधित कामगार व मजदूर संघाचे चिटणीस भुजबळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठेका विविध कामांचा काढला जातो, कामगारसंख्येचा नाही. ठेकेदाराने किती माणसे लावून काम करून घेतले, याच्याशी नगरपालिकेचा संबंध येत नाही. कंत्राटी कामगारांना कामावर ठेवण्याबाबत व विविध मागण्यांची बाब नगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत नाही. नगरपालिकेने संबंधित कामांचा ठेका दिला त्यावेळी ठेकेदाराने किती माणसांकडून काम करून घ्यावे हा त्याचा प्रश्न आहे. मात्र, विविध कामांसाठी नेमण्यात आलेल्या कामगारांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.
गेले दोन दिवस कामगार उपोषणाला बसलेले आहेत, मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्षच करीत आहे. या दोन दिवसांत आमच्या उपोषणाला समाजातील विविध संघटना व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, प्रशासन ढीम्मच असल्याने उद्या (दि.५) सकाळी १०.३० वाजता पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांना घेराव घालणार असल्याचे संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले.(वार्ताहर)
स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीय कामगार ठेवल्याने स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.याबाबत नगरपालिकेची ठेकेदार असलेली अथर्व एंटरप्रायझेस फर्मच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून माहिती घेतली असता, आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कुणालाही कामावरून कमी केलेले नाही स्वत:च्या मर्जीनुसार काहींनी काम सोडले आहे. त्यामुळे शहराची साफसफाई अत्यावश्यक सेवा असल्याने दुसरे कामगार बोलावत काम करून घेतले आहे.
मुळातच हा ठेका ई-टेंडरिंगनुसार उक्ता म्हणजेच ९९ लाख ७ हजार २०० रुपयांना घेतला आहे, तर मागील ठेकेदाराने हाच ठेका त्यावेळी १ कोटी २८ लाख रुपयांना घेतला होता. या ठेक्यामध्ये कामगारांची किती संख्या असावी ही बाब नमूद नव्हती तसेच ठेकेदारीमध्ये जुनेच कामगार ठेवावेत हे बंधन नाही. तरीही मागील ठेकेदार जे वेतन कर्मचाऱ्यांना देत होता तेच वेतन आम्हीही देण्यास तयार आहोत. उपोषण फक्त आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे.