जेजुरी रेल्वे स्टेशनच्या दुरुस्तीला हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 12:26 AM2018-12-22T00:26:28+5:302018-12-22T00:26:59+5:30
महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.
जेजुरी - महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.
जेजुरी येथे राज्यभरातून हजारो भाविक कुलदैवताच्या दर्शनाला येत असतात. यात रेल्वेमार्गे येणाºया भाविकांची संख्या ही मोठी असल्याने येथील रेल्वेस्टेशनचे आधुनिकीकरण करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील स्थानिक करीत होते.
जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे याबाबत खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. बुधवारी (दि. १९) खा. सुळे यांनी भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आश्विनी लोहाणी यांची दिल्ली येथील मुख्य कार्यालयात भेट घेत जेजुरी, नीरा आणि दौंड रेल्वेस्थानकातील समस्या, अडी-अडचणी सोडविण्यासाठी व विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रवीण शिंदे, जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
याच बैठकीत पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर इमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) तत्काळ सुरू करण्यात यावी. दौंड रेल्वेस्थानकाला सबर्ब रेल्वेचा दर्जा मिळावा, जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, कासुर्डी, सहजपूर, पाटस, सोनवडी, कुरवडी आदी ठिकाणी ओव्हरब्रिज निर्माण व्हावेत. मांजरी, कडेठाण स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे.
नीरा येथे मस्जिदकडे जाणाºया मार्गावर अंडरपास व्हावा. बारामती येथील रेल्वेस्थानकाच्या ताब्यात आणि सर्व्हिस रस्त्यालगत असलेली जागा रस्ता विकसित करण्यासाठी बारामती नगर परिषदेला ना-हरकत देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे खा. सुळे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष लोहाणी यांच्याकडे केली.
याबाबत लोहाणी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मागणीनुसार सर्व कामे मार्गी लावणार असून जेजुरी, नीरा व बारामती रेल्वेस्थानकाला भेट देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
मल्हारगडाची प्रतिकृती असलेल्या अत्याधुनिक इमारतीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर दोन नंबर प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, सोमवती उत्सव पालखीमार्गावरील अंडरपास, स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी जलशुद्धीकरण यंत्रणेसह पिण्याचे पाणी आणि सोई-सुविधांयुक्त कर्मचारी वसाहत आदी कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे आश्वासन भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आश्विनी लोहाणी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे.