जेजुरी होणार चकाचक, नगराध्यक्ष वीणा सोनवणे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:47 AM2019-01-06T00:47:56+5:302019-01-06T00:48:11+5:30
नगराध्यक्ष वीणा सोनवणे यांची माहिती : नगरपालिकेच्या ताफ्यात अजून ८ घंटागाड्या
जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ताफ्यात अजून ८ घंटागाड्या व २ ट्रॅक्टर वर्ग झाले असल्याची माहिती नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिली. जेजुरी नगरपालिकेकडे सध्या पालिकेच्या सहा आणि मार्तंड देव संस्थानकडून मिळालेल्या दोन अशा एकूण आठ घंटागाड्या आहेत. यातील केवळ चार घंटागाड्या सुस्थितीत असून शहरातील स्वच्छता विभागाला शहरातील ओला व सुका केरकचरा गोळा करण्यासाठी अडचणी येत होत्या.
पालिकेकडून अजून ८ घंटागाड्या आणि २ ट्रॅक्टर मिळावेत, म्हणून मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत याला मंजुरी मिळाली आहे. आज यातील चार घंटागाड्या मिळाल्या असून दोन दिवसांत इतर गाड्या मिळणार आहेत. पालिकेने स्वच्छ भारत अभियान २०१९ मध्ये सहभाग घेतलेला आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे दररोज मोठी गर्दी असते. येणाऱ्या भाविकांमुळे शहर स्वच्छतेबाबत अनेक अडचणी येत आहेत. तरीही पालिकेकडून मोठे काम उभे राहत आहे. आता स्वच्छतेसाठी नव्याने आलेल्या गाड्यांमुळे या अडचणी दूर होणार आहेत.
या घंटागाड्यांचे पूजन करून शुभारंभ पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, स्वच्छता विभाग समितीचे सभापती सुरेश सातभाई, पाणीपुरवठा समितीच्या सभापती शीतल बयास, महिला बालकल्याणच्या सभापती रुख्मिणी जगताप, नगरसेवक सचिन सोनवणे, बाळासाहेब दरेकर, अजिंक्य देशमुख, अरुण बारभाई, स्वच्छता विभागाचे बाळासाहेब बगाडे, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.