जेजुरी नगराध्यक्षपद होणार रद्द
By admin | Published: June 22, 2017 07:19 AM2017-06-22T07:19:14+5:302017-06-22T07:19:14+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले जातीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. यामुळे वीणा सोनवणे यांचे नगराध्यक्षपद रद्द ठरणार आहे. यासंदर्भात सोनवणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली असल्याचे सांगितले आहे.
गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी जेजुरी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात आले. निवडणुकीत जेजुरीचे नगराध्यक्षपद इतर मागास वर्ग जातीसाठी राखीव होते.
राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनल जयदीप बारभाई यांचा पराभव करीत कॉँग्रेसच्या वीणा सोनवणे या विजयी झाल्या होत्या. विद्यमान नगराध्यक्षा सोनवणे यांनी वाणी समाजाच्या असल्याचे जातीचे प्रमाणपत्र खोटे दिल्याची तक्रार मीनल बारभाई आणि नगरसेवक जयदीप बारभाई यांनी अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती.
जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव एस. एन. डावखर, सदस्य एस. आर. दाणे आणि अध्यक्ष पी. टी. वायचळ या समितीपुढे जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली. समितीपुढे स्वत:च्या जातीचे अधिकृत प्रमाणपत्र वैध असल्याचे योग्य ते पुरावे नगराध्यक्षा सोनवणे सादर करू न शकल्याने समितीने त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द ठरवले असून, पुढील कार्यवाहीसाठी समितीने पुणे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी पुरंदर, पुरंदर तहसीलदार तसेच जेजुरी मुख्याधिकाऱ्यांकडे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाकडून जो निर्णय होईल तो आपणास मान्य असेल, असे सोनवणे यांनी म्हटले आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात सुनावणी होईल.