‘येळकोट येळकोट’च्या गजरात जेजुरीगड दुमदुमला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:36 PM2019-02-19T23:36:14+5:302019-02-19T23:36:53+5:30
माघ पौर्णिमा उत्साहात : खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
जेजुरी : एकीकडे ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा आसमंत दुमदुमून टाकणारा गजर त्याच वेळी कोळीनृत्य व कोळीगीतांच्या तालावर भंडारा अन् खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण अशा उत्साही वातावरणात आज माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या यात्रेला सुरुवात झाली.
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देव भेट उरकली. माघ पौर्णिमेनिमित्त राज्यभरातील भाविक प्रासादिक शिखर काठ्यांसह जेजुरीला येऊन देवदर्शन घेत असतात. दर चार वर्षांनी कोकणातील मुंबई, अलिबाग, धारावी, वर्सोवा, रेवस, बोरणी, वेसाव, रायगड आदी परिसरातील कोळी बांधव पालख्या घेऊन जेजुरीस येतात. या वर्षी कोकणी बांधवांच्या ४० हून अधिक पालख्या देवभेटीसाठी जेजुरीत दाखल झाल्या आहेत. जेजुरीत कोळी बांधवासह शिखरी काठ्यांच्या समवेत आलेल्या भाविकांची जेजुरीत कालपासून मोठी गर्दी झालेली असून, राज्यभरातून भाविक आलेले आहेत.
सायंकाळी ५ च्या सुमारास कोळी बांधवांच्या पालख्यांनी जेजूरी गडावर जावून देवभेट घेतली, यावेळी ऐतिहासिक चिंचबाग ते खंडोबा गडापर्यंत भाविकांनी पालख्यांची मिरवणूक काढली होती.
आज रंगणार देवभेटीचा सोहळा
४बुधवारी शिखरी काठ्यांच्या देवभेटीचा सोहळा रंगणार आहे. हा सोहळा नेहमीच वादग्रस्त राहिल्याने पोलिसांनीच सोहळ्यातील मानकरी संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे यांना एकत्र बसवून वर्षाआड देवभेटीचा प्रथम मान देण्याचा तोडगा काढला. त्यामुळे यंदा सकाळी ९ ते ११ या वेळेत संगमनेरकर होलमांची मानाची शिखरकाठी सोबतच्या प्रासादिक शिखरकाठ्यासह गडावर जाऊन देवभेट घेणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत सुपेकर खैरे यांची मानाची शिखरकाठी देवभेटीला जाणार आहे. त्यांच्यासोबत स्थानिक होळकरांची शिखरकाठी ही देवभेट घेणार आहे.