संकटांचा सामना एकत्रपणे करण्याचा येशुचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:08+5:302021-04-02T04:12:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोना साथीच्या संकट काळात यंदाचा गुड फ्रायडे विशेष अध्यात्मिक बळ देऊन आशा पल्लवीत करणारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोना साथीच्या संकट काळात यंदाचा गुड फ्रायडे विशेष अध्यात्मिक बळ देऊन आशा पल्लवीत करणारा आहे. मानवी जीवनातील दु:ख संकटांशी आपण एकत्रीतपणे सामना करु या,” असे आवाहन बिशप थॉमस डाबरे यांनी केले.
शुक्रवार (दि. २)च्या ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी ख्रिश्चन समाज येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे पुण्यस्मरण करतात. याचे औचित्य साधत डाबरे यांनी हा संदेश दिला.
डाबरे म्हणतात की, खूप लोकांची अशी धारणा असते की, दु:ख हा शाप आहे. विधिलिखीत आहे. शिक्षा, सूड आहे. काहींना वाटते की दु:ख हेच निराशा, अपेक्षाभंग व रागसंताप यांचे प्रमुख कारण आहे. दु:ख संकटापायीच लोक आत्महत्या करतात. कोरोनामुळे लोकांच्या ताणतणाव, चिंता, एकलेपणात वाढ झाली आहे. मात्र प्रभु येशुने त्याचे दु:ख व क्रुस आनंदाने, धिटाईने आणि मनी आशा बाळगून स्विकारले आणि सहन केले. त्याने दु:ख, संकटे वरदान मानले. “आपल्या मित्रांसाठी आपले प्राण वेचणे याहून जास्त प्रेम असू शकत नाही,” असे येशुचे वचन आहे.
ज्या माणसाचा निर्दयपणे खून करण्यात आला होता त्याच माणसाने स्वखुशीने आणि उत्स्फूर्तपणे क्षमा करावी ही मानवी इतिहासातील अद्वितीय घटना आहे. येशुचे बलिदान मानवतेच्या ऐक्यासाठी होते. म्हणूनच दु:ख, संकटांपुढे विशेषत: कोरोनापुढे नांगी टाकू नये. येशुच्या क्रुसाकडे पाहून जीवनातील दु:ख, संकटे, समस्या, आव्हानांना धैर्याने आणि आशेने तोंड देऊ या, असे डाबरे यांनी म्हटले आहे.