पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरीला
By नितीश गोवंडे | Published: March 20, 2023 04:20 PM2023-03-20T16:20:47+5:302023-03-20T16:20:58+5:30
दोन्ही घटनेत घराचे कुलूप तोडून दागिने आणि पैसे चोरले
पुणे : दिवसेंदिवस शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, दररोज शहराच्या विविध भागांमध्ये घरफोड्या झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. आंबेगाव खुर्द आणि लोहगाव येथील दोन घरे चोरट्यांनी फोडून २ लाख ९५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यातील पहिल्या घटनेत बालाजी राम जाधव (वय ३८, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमध्ये असलेल्या कपाटातील लॉकर तोडून २४ ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख १ लाख असा १ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत अतुल सुरेंद्र राणे (३४, रा. एलोरा ईलाईट सोसायटी, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील १ लाख २९ हजार रुपयांचे ४५.६९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.