लग्नकार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून पळविले साडेचार लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 03:23 PM2018-04-25T15:23:22+5:302018-04-25T15:23:22+5:30
थेरगाव येथे लग्न सोहळ्याला गेलेल्या महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पिंपरी: लग्नसोहळ्यावेळी वरपक्षाच्या खोलीत ठेवलेले ४ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवले. हा प्रकार थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. निगडी येथे राहणा-या ३१ वर्षीय महिलेने याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात गेल्या होत्या. त्यांच्या बरोबर सोन्याचे दागिने होते. त्यांनी ते दागिने एका कपड्याच्या पिशवीत ठेवून आणि ही पिशवी नवरदेवाच्या खोलीत ठेवली. अज्ञात चोरट्यांनी या दागिन्यांच्या पिशवीवर डोळा ठेवत ती लंपास केली. लग्न सोहळा पार पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र, सुरुवातीला पाहुण्यांकडे विचारपूस करण्यात आली. कोणाकडेही ही दागिने नसल्याचे लक्षात येताच महिलेने वाकड पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दिली .