खडकीत कमी कॅरेटचे दागिने देणाऱ्या सोनारांची चोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:56 PM2018-08-11T15:56:24+5:302018-08-11T16:00:51+5:30
सावधान..! सोने घेताय तुमची फसवणूक तर होत नाहीये ना.. कारण असाच प्रकार खडकीत उघडकीस आला आहे.
पुणे : तुमच्या गळ्यातील नेकलेस चांगला आहे़. किती कॅरेटचा आहे असे प्रश्न एखाद्या महिलेला केला तर त्या महिलेला आपण घेतलेला सोन्याचा दागिना हा नेमका किती कॅरेटचा आहे हे सांगता येत नाही़. ज्वेलर्स सांगतात ते नक्की खरे आहे का?, आपली फसवणूक तर होत नाही ना? अशा अनेक शंका नागरिकांना सोन्याचे दागिने घेताना येत असतात़. पण, त्याची खात्री नेमकी कोठे करायची याची माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येते़. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या खडकी बाजारमधील मॉडर्न ज्वेलर्सचा हो गोरख धंदा उघड झाला आहे़.
खडकीपोलिसांनी खडकी बाजारमधील मॉडर्न ज्वेलर्स चे निलेश शांतीलाल जैन आणि कमलेश शांतीलाल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी अक्षय अनंत शिंदे (वय २९, रा़ जुना बाजार, खडकी) यांनी पुणे शहर युवक काँग्रेस आणि खडकी कँट्रोंमेंट ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष शिंदे यांनी मॉडर्न ज्वेलर्समधून आपल्या वडिलांसाठी २४ जुलै रोजी सोन्याची अंगठी खरेदी केली होती़. त्यावेळी सोनारांनी ती २३ कॅरेटची असल्याचे सांगितले होते़. घरी जाऊन इतरांना दाखविली तेव्हा त्यांना त्यातील सोन्याविषयी शंका आल्या़. शिंदे यांनी पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या कारखान्यातून ती तपासून घेतली़. तेव्हा ही अंगठी २३ कॅरेटची नसून केवळ १६़७१ कॅरेटची असल्याचे आढळून आले़. या कारखान्याने दिलेला तपासणीचा अहवाल घेऊन त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे़. पोलिसांनी ज्वेलर्सवर गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक एम़ एम़ कांबळे अधिक तपास करीत आहेत़.