दागिन्यांपेक्षा जवानांचे प्राण महत्वाचे, सुमेधा चिथडेंनी दागिने मोडून केली जवानांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:37 PM2018-04-16T18:37:26+5:302018-04-16T19:34:31+5:30
दागिन्यांपेक्षा काहीजणी सामाजिक उत्तरदायित्व अधिक महत्वाचे मानतात आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे.
पुणे : दागिने...स्त्रियांचा लाडका विषय आणि त्याच्यासोबत जोडलेल्या आठवणीसुद्धा..आई, आज्जी, सासूबाई अशा मागच्या पिढ्यातल्या बायकांनी दिलेला ठेवा प्रत्येक स्त्री मोठ्या प्रेमाने आणि अभिमानाने मिरवते. मात्र काहीजणी या आठवणींपेक्षाही सामाजिक उत्तरदायित्व अधिक महत्वाचे मानतात आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी याच प्रकारे आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे. चिथडे या स्वतः त्यांचे वायुदलातून निवृत्त झालेले पती योगेश चिथडे यांच्यासह १९९९पासून सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या मार्फत शहीद जवानांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे, वीरपत्नींना शिक्षण देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, जवानांना फराळ पाठवणे, राखी पाठवणे आणि तरुणांमध्ये लष्करी सेवेचे पर्याय मांडणे अशी विविध कामे केली जातात. त्यात सियाचीन येथे अतिशय थंडीत देशाच्या संरक्षणासाठी दिवस रात्र उभ्या असणाऱ्या जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. यासाठी मदतीची गरज असून सुमेधा यांनी स्वतःपासून सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या लग्नातल्या पाटल्या आणि काही दागिने मोडून त्याचे पैसे संस्थेसाठी दिले आहेत. त्या स्वतः घारपुरे प्रशाला या शाळेत शिक्षिका असून त्यांचे चिरंजीव मेजर ऋषिकेश हे सध्या डोकलाम येथे सेवा बजावत आहेत. याबाबत सुमेधा यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी माझ्यासाठी दागिने नाही तर जवान अधिक महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.