कात्रज, बिबवेवाडीत दोन महिलांचे दागिने हिसकावले; एकाच टोळीने केले दोन्ही गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:03 PM2020-11-02T16:03:21+5:302020-11-02T16:06:53+5:30
सणासुदीला महिला दागिने घालून घराबाहेर पडत असतात. ही संधी साधून सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
पुणे : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले आहेत. कात्रज, बिबवेवाडी येथे काही वेळेच्या अंतराने दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांच्या जोडीने हे दोन्ही गुन्हे केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून स्पष्ट झाले आहे. मोटारसायकल चालकाने हेल्मेट घेतले होते़ तसेच पाठीमागे बसलेल्याने मास्क लावलेला होता़ त्यांनी वापरलेली मोटारसायकल नवीन असून तिला नंबरप्लेट नव्हती़
याप्रकरणी कात्रज येथे राहणाऱ्या एका ५६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्या व त्यांची बहीण या रविवारी सायंकाळी ७ वाजता भाजी आणण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे १२ ग्रॅम वजनाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील शिवशंभोनगर येथील युनिक स्कुलसमोर रात्री सव्वासात वाजता घडली.
त्यानंतर दुसरी घटना बिबवेवाडी येथील जेधेनगरमधील चिंतामणी हॉस्पिटलशेजारील उरसळ बंगल्यासमोर रात्री पावणे आठ वाजता घडली़ जेधेनगर येथे राहणाऱ्या ४२ वर्षाच्या महिला पतीसह चालत जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७१ हजार २५० रुपयांचे २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. सणासुदीला महिला दागिने घालून घराबाहेर पडत असतात. ही संधी साधून सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.