साड्या देण्याच्या आमिषाने लांबवले दागिने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 02:19 AM2018-12-21T02:19:09+5:302018-12-21T02:19:36+5:30
महिलेस लुटले : महात्मा फुले पेठेमध्ये चोरट्याने केली हातचलाखी
पुणे : कामाच्या शोधात निघालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला काम देण्याच्या बहाण्याने तसेच साड्या देण्याच्या आमिषाने एका चोरट्याने गंडविले. या महिलेच्या अंगावरील सोने रुमालात बांधून देताना हातचलाखी करुन हे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महात्मा फुले पेठेमध्ये घडली. खडक पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट््याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला भवानी पेठेमध्ये राहते. त्या धुण्याभांड्याची तसेच आया म्हणून काम करतात. गुरुवारी दुपारी त्या कामाच्या शोधात निघालेल्या असताना आरोपीने त्यांना गाठले. त्यांची विचारपूस केली. त्या वेळी या महिलेने आपण कामाच्या शोधात असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना माझ्या ओळखीच्या एक भाभी आहेत. त्या भाभी साड््या वाटत आहेत. आपणास त्यांच्याकडून काम आणि साडी मिळवून देतो असे सांगितले. त्यांना घेऊन आरोपी महात्मा फुले पेठेतील पितृछाया बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. त्यांना पहिल्या मजल्यावर जाऊन भाभी यांना भेटण्यास सांगितले. दरम्यान, त्याने पार्किंगमध्येच त्यांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. आपल्या अंगावर दागिने पाहिल्यावर त्या भाभी काम द्यायच्या नाहीत अशी भीती घातली.
कामाची आवश्यकता असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सोन्याचे गंठण आणि लक्ष्मीहार असा ५६ हजारांचा ऐवज शंभर रुपयांच्या नोटेत बांधण्याचे नाटक केले. हातामध्ये असलेल्या रुमालात हा सर्व ऐवज ठेवला. त्यांचे लक्ष विचलित करुन त्याने रुमाल बदलला. आरोपी तेथून गेल्यावर ही महिला पहिल्या मजल्यावर गेली. मात्र, तेथे कोणी भेटले नाही.
घरी जाऊन रुमाल उघडून पाहिल्यावर त्यामध्ये विटांचे खडे बांधल्याचे आढळून आले. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता पाडोळे करीत आहेत.
बतावणी करून ज्येष्ठांना टार्गेट
लग्नसराई सुरु झालेली आहे. नागरिकांनी घरातील आणि बँकांमधील लॉकरमधील दागिने बाहेर काढायला सुरुवात केली आहे. याकाळात चोरटे अधिक सक्रिय होतात. त्यामुळे चोऱ्या आणि अशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता असते. चोरटे ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करुन, तसेच आनंदाच्या वार्ता सांगून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने गंडवितात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच आपल्याकडील मौल्यवान दागिने कोणाकडेही देऊ नयेत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- कविता पाडोळे,
पोलीस उपनिरीक्षक