पूजेच्या बहाण्याने दागिने लंपास
By Admin | Published: December 24, 2016 12:49 AM2016-12-24T00:49:21+5:302016-12-24T00:49:21+5:30
मालकाने पाठवल्याची बतावणी करीत सुट्ट्याचे बंदे करून घेण्याच्या तसेच पूजा घालण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ६७ हजारांचा
पुणे : मालकाने पाठवल्याची बतावणी करीत सुट्ट्याचे बंदे करून घेण्याच्या तसेच पूजा घालण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ६७ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
याबाबत सुभाष पवार (वय ६४, रा. स्वामी समर्थनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ३० ते ४० वयोगटातील अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार गेल्या १५ वर्षांपासून तुळशीबागेतील जान्हवी मॅचिंग्ज दुकानामध्ये काम करतात. बुधवारी सकाळी त्यांच्या दुकानात आलेल्या व्यक्तीने आपल्याकडे सुट्टे असून, रवीशेठ यांनी पाठवल्याचे सांगितले. शंभर रुपयांच्या नोटा घेऊन दोन हजारांची नोट देण्यास त्याने सांगितले किंवा ५० रुपयांच्या दोन नोटा देण्यास सांगितले.
त्याच्याकडून १०० रुपयांची नोट घेतल्यावर त्यांनी ५० रुपयांच्या दोन नोटा दिल्या. त्यानंतर त्याने आपल्याला पूजा करायची असल्याचे सांगत पवार यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट आणि हातातील दोन अंगठ्या मागितल्या. हा ऐवज ५० रुपयांच्या नोटेला लावून परत देतो, असे सांगताच पवार यांनी दागिने काढून दिले. आरोपीने हे दागिने नोटेच्या पुडीमध्ये बांधून ही पुडी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याचे नाटक केले. हातचलाखी करून हे दागिने घेऊन चोरटा पसार झाला.