दागिने लंपास करणारा गजाआड
By Admin | Published: April 10, 2017 02:57 AM2017-04-10T02:57:47+5:302017-04-10T02:57:47+5:30
कात्रज परिसरात सोन्याचे बनावट दागिने दाखवून सोन्याचे खरे दागिने हातचलाखीने लंपास करणाऱ्या
पुणे : कात्रज परिसरात सोन्याचे बनावट दागिने दाखवून सोन्याचे खरे दागिने हातचलाखीने लंपास करणाऱ्या चोरट्यास गजाआड करण्यात भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांना यश आले.
सुरेश दयाभाई परमार (वय ३४, आशीर्वाद प्रोजेक्ट, फ्लॅट नं. ६०३, करंजावडे, सेक्टर ५, पनवेल, रायगड) असे आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार जिक्या काळे (सांगली) पसार झाला आहे. तोसुद्धा सराईत गुन्हेगार आहे. परमार गुजरातचा मूळ रहिवासी असून, त्याने पारधी समाजातील महिलेशी लग्न केले आहे. पारधी लोकांबरोबर राहुनच गुन्हे केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पुढे गर्दी आहे, दागिने काढून ठेवा, असे सांगून महिला आणि वृद्धांना दागिने काढण्यास सांगून बनावट दागिने हातचलाखीने देणे, एखाद्या महिलेची पर्स लांबविणे, कोणाला स्वस्तामध्ये दागिने विकण्याचे आमिष दाखविणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी गुन्हे केले असून, ठिकाणे बदलत राहण्याच्या पद्धतीमुळे त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या.
हवालदार प्रदीप गुरव यांना ५ तारखेला आरोपींबाबत माहिती मिळाली. कात्रज-आंबेगाव भागात बतावणी करून हातचलाखीने फसवणूक करून चोऱ्या करणारे दोघे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलाखाली थांबले आहेत, त्यांच्याकडे बनावट दागिने असून ते गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाल्याने फौजदार उत्तम बदगुडे यांना सांगितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आल्यानंतर, पथकासह पुलाजवळ छापा घालण्यात आला. परमार याची झडती घेतली असता बनावट सोन्याच्या ९ अंगठ्या व मण्यांची पिवळ्या धातूची माळ आढळून आली.
प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, श्रीधर पाटील, समीर बागसिराज, बाबासाहेब नरळे यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)
परमार याने बतावणी करून फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. भारती विद्यापीठ ठाण्याच्या हद्दीत झालेले ५ गुन्हे उघड झाले आहेत. त्याला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्याची घरझडती घेतली असता बनावट सोन्याच्या आणखी २१ अंगठ्या व ४ पाटल्या मिळून आल्या आहेत.