मंडईतील शारदा-गणेश मंदिरात दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2015 03:26 AM2015-07-09T03:26:39+5:302015-07-09T03:26:39+5:30

अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेश मंदिरामधील महिरपीची काच फोडून चोरट्याने ४३ लाख ४८ हजार ७२३ रुपयांचे दागिने लंपास केले.

Jewelry theft in the Sharda-Ganesh temple in the Mandai | मंडईतील शारदा-गणेश मंदिरात दागिन्यांची चोरी

मंडईतील शारदा-गणेश मंदिरात दागिन्यांची चोरी

Next

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेश मंदिरामधील महिरपीची काच फोडून चोरट्याने ४३ लाख ४८ हजार ७२३ रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चोरट्याची प्रत्येक कृती मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मंडई परिसरात अखिल मंडई मंडळाचे शारदा-गणेश मंदिर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचे नूतनीकरण झाले आहे. या मंदिरातील शारदा-गणेशाची मूर्ती शंभर वर्षे जुनी आहे. कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री मंदिर बंद केले होते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दाढी वाढलेला, अंगाने सडपातळ असलेला हा चोरटा मंदिराजवळ आला.
सभामंडपाच्या जवळच्या चिंचोळ्या बोळामध्ये बराच वेळ तो येरझाऱ्या घालत होता. मंदिराच्या महिरपीला असलेली काच विटा मारून फोडून तो आत घुसला. मूर्तीवरील हार, मंगळसूत्र, साखळी, पूजासाहित्य आणि मोहनमाळ असा ऐवज त्याने खिशात भरला. बराच वेळ मूर्तीसमोर घुटमळणाऱ्या या चोरट्याने चोरी करताना गजाननाच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 

मंदिराचे पुजारी श्रीपाद कुलकर्णी बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणो मंदिरात आले असता महिरपीची काच फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जवळच असलेल्या मंडई पोलीस चौकीमध्ये धाव घेतली. मुर्तीवरील आभुषणो आणि पुजा साहित्य चोरीला गेल्याचे समजताच पोलिसांसह मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय मते, अॅड. मंदार जोशी, भोला वांजळे, मोहन ढमढेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील विविध गणोशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिका-यांनी मंडई मंडळाकडे धाव घेतली. 
घटनास्थळाला उपायुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त अनिल पाटील, वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट, गुन्हे शाखेचे निरीक्षक रघुनाथ फुगे यादींनी भेट दिली. 


चोरट्याने रेकी केल्याचे स्पष्ट

मंदिराच्या भोवती बराच वेळ घुटमळत चोरट्याने आसपास कोणी नाही, याची खात्री केली. मंदिरालगच्या चिंचोळ्या बोळामधून तो सभामंडपापर्यंत गेला. त्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली. त्यानंतर महिरपीच्या काचेवर दगड मारून आत प्रवेश केला.

चोरट्याने मंदिरामधील मूर्तीवरील दागिने चोरून नेल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून गुन्हा उघडकीस आणावा, तसेच चोरट्याला गजाआड करावे. आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले असून तपासात पूर्ण सहकार्य करीत आहोत.
-अण्णा थोरात, अध्यक्ष, आखिल मंडई मंडळ

Web Title: Jewelry theft in the Sharda-Ganesh temple in the Mandai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.