जिगरबाज... ST चालकाने स्टेअरिंगवरच सोडला जीव, पण मृत्यूपूर्वी 25 प्रवाशांना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 09:07 AM2022-08-05T09:07:14+5:302022-08-05T09:07:58+5:30

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, तीन ऑगस्ट रोजी वसई-म्हसवड (सातारा) ही एसटी बस (एमएच १४, बीटी ३३४१) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट स्थानकात आली

Jigarbaaz... ST driver lost his life on the steering wheel, but saved 25 passengers before dying on pune satara road | जिगरबाज... ST चालकाने स्टेअरिंगवरच सोडला जीव, पण मृत्यूपूर्वी 25 प्रवाशांना वाचवले

जिगरबाज... ST चालकाने स्टेअरिंगवरच सोडला जीव, पण मृत्यूपूर्वी 25 प्रवाशांना वाचवले

googlenewsNext

पुणे (नसरापूर) : जीवापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे मानणाऱ्या व्यक्ती आजपर्यंत तुम्ही केवळ सैन्यात पाहिल्या, ऐकल्या आणि वाचल्या असतील; मात्र महामंडळाच्या एसटी मंडळातील चालकांकडूनही असे कर्तव्य बजावले गेले. स्वत:चा काळ आला असताना चालकाने एसटीमध्ये बसलेल्या तब्बल २७ प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित केले आणि त्यानंतरच जगाचा निरोप घेतला. एखाद्या पुस्तकात वाचावी अशीच घटना आज पुरंदर तालुक्यातील राजगडाजवळ घडली आणि त्या जिगरबाज चालकाचे नाव जालिंदर रंगराव पवार आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, तीन ऑगस्ट रोजी वसई-म्हसवड (सातारा) ही एसटी बस (एमएच १४, बीटी ३३४१) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट स्थानकात आली. तेथे चालकांची बदली झाली आणि गाडीचा ताबा जालिंदर रंगराव पवार (वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी घेतला. त्यानंतर गाडी म्हसवडच्या दिशेने रवाना झाली. पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्याच्या पुढे वरवे गावाच्या हद्दीत आल्यानंतर गाडीचा वेग अचानक मंद झाला. त्यावेळी त्यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी केबिनजवळ जाऊन त्यांना गाडीचा वेग कमी का केला असे विचारले, त्यावेळी पवार यांचा चेहरा घामाने भिजून गेला होता, मला चक्कर येत आहे असे सांगितले. त्यांना असह्य वेदना होत असतानाही गाडीवरचे नियंत्रण सोडले नाही आणि गाडी सावकाश रस्त्याच्या डाव्या कडेला लावली व सुरक्षित थांबविली. त्यावेळी त्यांच्या छातीमध्ये प्रचंड कळ आली आणि त्यांनी स्टेअरिंगवरच डोके ठेवले. त्यांना उठविण्यासाठी वाहक गवळी केबिनमध्ये धावून आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उठले नाहीत. त्यानंतर गाडीचा ताबा एका प्रवाशाने घेतला व गाडी तातडीने जवळच असलेल्या नसरापूर येथील सिद्धिविनायक येथील रुग्णालयात नेली.

पंचवीस प्रवाशांसह गाडी रुग्णालयात पोचली. चालकाला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी कल्पना एसटीतील सर्वच प्रवाशांना आली होती. त्यामुळे जालिंदर यांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यावर प्रत्येक प्रवाशी त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करत होता. मात्र सर्व प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी अगदी वेळेवर एसटी बाजूला उभी करणाऱ्या जालिंदर यांना मात्र रुग्णालयात उपचारासाठी वेळेत पोहोचता आले नाही आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा तीव्र झटका आला असतानाही जालिंदर यांनी तो सहन केला, केवळ प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी. वेगात असणाऱ्या एसटीवरील नियंत्रण सुटले असते तर कदाचित एसटीचा अपघातही झाला असता. त्यामुळे एसटीतील पंचवीस प्रवाशांबरोबर बाहेरील वाहनांच्या अपघाताची शक्यताही निर्माण झाली असती. मात्र जालिंदर यांच्या कर्तव्यदक्ष स्वभावाने मृत्यूलाही थोडा वेळ बाजूला ठेवले आणि त्यांनी प्रवाशांना सुरक्षित करून त्याच स्टेअरिंगवर देह ठेवला. या घटनेमुळे अनोळखी चालकासाठीही एसटीतील सर्व प्रवाशांचे डोळे पाणावले. त्यांच्या मृत्यूनंतर भोर येथील रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, नसरापुरातील एसटीवर दुसरे चालक मागवून एसटी म्हसवडला मार्गस्थ झाली.

Web Title: Jigarbaaz... ST driver lost his life on the steering wheel, but saved 25 passengers before dying on pune satara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.