जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:01+5:302021-06-30T04:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला पुणे पोलिसांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने इंदूर येथून ताब्यात घेतले आहे. कंडारे याच्याकडे एक डायरी सापडली असून त्यात अनेकांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. कंडारे याच्या अटकेने या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
इंदूर येथे सोमवारी रात्री एका वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या कंडारे याला पुणे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला इंदूर येथील न्यायालयात हजर करून पुण्याला आणण्यासाठी ट्रॉझिंट वॉरंट घेण्यात आले. त्यानंतर हे पथक त्याला घेऊन पुण्याकडे निघाले असून बुधवारी सकाळी पुण्यात येईल. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली. अवसायक जितेंद्र कंडारे हा ७ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा माग सोडला नाही.
...
३५ हजार ठेवीदार आणि ८०० कोटींचा घोटाळा
बीएचआर पतसंस्थेचे महाराष्ट्रासह इतर राज्यात मिळून ३५ हजारांहून अधिक ठेवीदार आहेत. या आर्थिक घोटाळ्याच्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये ६५० हून अधिक लोक गुंतले आहेत.
....
जेवणासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला
मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो मध्य प्रदेशासह अन्य दोन ते तीन राज्यांमध्ये फिरत होता. काही दिवसांपासून तो इंदूरमधील एका वसतिगृहामध्ये आपली ओळख लपवून राहत होता. तो संपूर्ण वेळ खोलीत राहत असे. पुणे पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी वसतिगृहावर पाळत ठेवली. सोमवारी रात्री तो जेवणासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
....
बीएचआर आर्थिक घोटाळा प्रकरणात कंडारे आणि सुनील झंवर हे दोघे मुख्य सूत्रधार आहेत. त्यापैकी झंवर हा अजूनही फरार आहे. कंडारे याला सोमवारी रात्री इंदूरमधून अटक करण्यात आली. त्याला पुण्यात बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
- भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे