जितो कोविड सेंटरला माननीयांचा कोलदांडा घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:56+5:302021-04-04T04:10:56+5:30
ʻजितोʼ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ʻकोविड केअर सेंटरʼ सुरू करण्यात येत आहेत. गतवर्षीही त्यांच्या या ...
ʻजितोʼ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ʻकोविड केअर सेंटरʼ सुरू करण्यात येत आहेत. गतवर्षीही त्यांच्या या कार्याची दखल विभिन्न पातळ्यांवर घेण्यात आली होती. कोणतेही शुल्क न आकारता केवळ सेवा भावनेने संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून ते बरे होऊन सुखरूप घरी पोहचले आहेत.
या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढताच संस्थेने विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या मालिकेत शिवाजीनगर भागातील स्पॅन एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये रविवार (ता.४) पासुन कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. त्याबाबत तयारी सुरू असल्याचे समजताच रेव्हेन्यू कॉलनीतील काही रहिवाशांनी शनिवारी विचारपुस सुरू केली. इतकेच नव्हे तर स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे याही संबंधित ठिकाणी आल्या आणि विरोध दर्शवू लागल्या.
याबाबत, ʻलोकमतʼने एकबोटे यांच्याकडे संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, संबंधित हॉटेल हे रस्त्याच्या एका कोपऱ्यात आहे. ते इतरांना धोकादायक ठरू शकते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच, या परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. त्यांना धोका होऊ शकतो. आजच काही रुग्ण रिक्षाने येथे आले. महापालिकेने याबाबत निर्णय घ्यावा. संस्थेने अन्यत्र सेंटर सुरू करावे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, ʻजितोʼ ने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सेंटर सुरूच झालेले नाही तर रुग्ण कसे येतील ॽ, आम्ही महापालिकेची परवानगी घेतली आहे. रहिवाशांनी प्रत्येक ठिकाणी असा विरोध केला तर आताच्या आणीबाणीच्या परिस्थितीत काम करणार कसे, अशीही विचारणा केली.
दरम्यान, या सेंटरचे उद्घाटन उद्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे.