...हा तर जिझिया कर
By admin | Published: April 1, 2017 02:33 AM2017-04-01T02:33:28+5:302017-04-01T02:33:28+5:30
महापालिकेचे आगामी (२०१७-१८) या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना प्रमुख रस्त्यांवरील पार्किंगला शुल्क
पुणे : महापालिकेचे आगामी (२०१७-१८) या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना प्रमुख रस्त्यांवरील पार्किंगला शुल्क आकारण्याचा प्रस्ताव हा पुणेकरांवर लादलेला जिझिया करच असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांवर धावणारी खासगी वाहने कमी करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील पार्किंगला शुल्क लावण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी अंदापत्रकामध्ये मांडला आहे. नागरिकांनी खासगी वाहने वापरू नयेत, यासाठी व्यवस्था केली जात असताना सार्वजनिक वाहतूकव्यवस्था मात्र सक्षम नाही.
शहरातील पीएमपी बस भरून वाहत आहेत, त्याच वेळी खासगी वाहनांच्या वापरावरही निर्बंध आणणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मनसेचा त्याला ठाम विरोध आहे, असे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.
सध्या महापालिकेच्या मालकीच्या पार्किंगच्या जागा या व्यावसायिक लोकांचे अड्डे बनले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरही पर्किंगला शुल्क लागू केल्यास तिथेही असाच प्रकार घडू शकेल. पार्र्किं गच्या ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने नागरिकांकडून शुल्क वसूल केले जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीही रस्त्यावरच्या पार्किंगला शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र, मुख्य सभेने ते एकमताने फेटाळून लावले. आता स्वतंत्र पार्किंग धोरण तयार करून ते मांडण्यात आले आहे. स्थायी समितीकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.