क्षणभर विश्रांतीचा पुण्यातील जे. एम.रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:48 PM2018-03-15T14:48:24+5:302018-03-15T14:48:24+5:30
शहराच्या गाेंगाटात, धकाधकीच्या अायुष्यात क्षणभर विश्रांती हवी असेल, तर पुण्यातील जंगली महाराज रस्त्याला तुम्ही भेट द्यायला हवी. येथील विशिष्ट रचना पुणेकरांच्या पसंतीस पडत अाहे.
पुणे : सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण क्षणभर विश्रांतीच्या शोधात असतो. शहरातील गोंगाटामध्ये अर्धातास का होईना शांत बसता यावे अशी एखादी जागा शहरात असावी असे प्रत्येकाला वाटत असते. नागरिकांची हिच इच्छा पुणे महानगरपालिकेने पुर्ण केली आहे. पालिकेने पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे (जे.एम. रस्ता) वेगळ्या पद्धतीने सुशोभिकरण केले असून या ठिकाणी नागरिकांसाठी बसण्यास विशिष्ठ व्यवस्था करण्यात आल्याने, नागरिकांची याला मोठी पसंती मिळत आहे.
पुण्यातील शांतपणा, झाडांनी अच्छादलेले रस्ते सर्वांनाचा आकर्षित करत असतात. मात्र वाढत्या शहरीकरणामध्ये ही शांतता हरवत चालली होती. जे.एम रस्त्यावर करण्यात आलेल्या नव्या रचनेमुळे गोंगाटामध्येही शांतता आता नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. खास करुन तरुणाईमध्ये या जागेचे खास आकर्षण असून मित्र-मैत्रीणींसोबत गप्पा मारण्यासाठी हक्काचे ठिकाण आता तयार झाले आहे. या ठिकाणी बसल्यावर आपण नक्की भारतातच आहोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. डबा खायचा असेल किंवा मग समोरा समोर बसून चर्चा करायची असेल, जे.एम रस्ता आता नवीन हँगिग आऊट साठीचा स्पॉट म्हणून समोर येत आहे.
शेजारीच बालगंधर्व रंगमंदिर आणि संभाजी उद्यान आहे. त्यामुळे नाटक बघायला आला असाल आणि कोणाची वाट पाहताय तर तुम्हाला जागेची शोधा शोध करण्याची गरज नाही. याठिकाणचा फुटपाथही मोठा असल्याने पादचाऱ्यांचाही तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही शांतपणे तुमचं काम करु शकता. अनेक स्मार्ट पुणेकर तर आपल्या लॅपटॉपवरही या ठिकाणी काम करत तासनतास बसतात. इथे बसून पुस्तके वाचणाऱ्यांची आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. या सारखीच रचना शहराच्या इतर भागातही करण्यात येत आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांनाही हा अनुभव आता घेता येणार आहे.