JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 08:48 PM2020-01-07T20:48:50+5:302020-01-07T20:49:28+5:30
जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत रॅली काढण्यात आली.
पुणे : जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालय (जेएनयु) मध्ये रविवारी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी फिल्म इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत माेर्चा काढण्यात आला. या माेर्चात शेकडाे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.
जेएनयुमध्ये रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करत साेमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध 30 संघटनांनी निषेध सभेचे आयाेजन केले हाेते. त्यानंतर मंगळवारी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निषेध माेर्चाचे आयाेजन केले. एफटीआयआयपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत हा माेर्चा काढण्यात आला. या माेर्चात शेकडाे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यावेळी केंद्र सरकारच्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारवर टीका करणारे विविध फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले हाेते. पुणे विद्यापीठात या माेर्चाचे सभेत रुपांतर झाले. या माेर्चाच्यावेळी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त हाेता.
सीएए, एनआरची माहिती देणारे पत्रक
या माेर्चामध्ये काही विद्यार्थी सीएए आणि एनआरसी हे कायदे काय आहेत याबाबत माहिती असणारे पत्रक वाटत हाेते. या पत्रकाच्या माध्यामतून या कायद्यांना विद्यार्थी का विराेध करत आहेत, हे सांगण्यात आले. त्यात सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांचा एकमेकांशी असलेला संबंधही विषद करण्यात आला हाेता. नागरिकांना हे कायदे कसे चुकीचे आहेत हे कळावे यासाठी हे पत्रक वाटत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.