नोकरीच्या आमिषाने घातला गंडा
By admin | Published: April 24, 2017 05:09 AM2017-04-24T05:09:32+5:302017-04-24T05:09:32+5:30
परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ६५ जणांची ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्लोबल स्टार मॅनेजमेंट
पुणे : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ६५ जणांची ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्लोबल स्टार मॅनेजमेंट या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले.
भावनेशकुमार जस्सूभाई पटेल (वय ३९, जय विजय ए, दर्शनी चौक, लोढा कॉर्नर, सहकारनगर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो कुटुंबासह फरार झाला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे यांनी त्याच्या तपासासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्याला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली.
मोहन विष्णू देठे (वय ३०, धोंडेवाडी, पंढरपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. गेल्या फेब्रुवारीपासून आॅक्टोबरपर्यंत फसवणुकीचा प्रकार सुरू होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला
होता.
पटेल याने नोकरी लावण्याच्या आमिषाने स्वीकारलेले पैसे स्वत:च्या बँकेत भरले आहेत. त्याची त्याने काय विल्हेवाट लावली, तो मुख्य आरोपीच्या संपर्कात आहे का, हे तपासण्यासाठी मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासायाचे आहे. मुख्य आरोपीचा ठावठिकाणा शोधायचा आहे, त्यासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सहायक सरकारी वकील एस. जे. बागडे यांनी मागितली.
न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी मंजूर केली. (प्रतिनिधी)