शहरात सिव्हिल इंजिनिअरना मिळेना नोकरी
By admin | Published: April 23, 2016 12:32 AM2016-04-23T00:32:54+5:302016-04-23T00:32:54+5:30
औद्योगिक, आर्थिक मंदी व राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर झाल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयांत दिसत आहे.
पिंपरी : औद्योगिक, आर्थिक मंदी व राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर झाल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयांत दिसत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात शहरातील महाविद्यालयांतील कॅम्पस इंटरव्ह्यूत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांत सुमारे ३० ते ४० टक्के घट झाली असल्याचे चित्र आहे.
कन्स्ट्रक्शन उद्योग हा कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार निर्मिती करणारा उद्योग आहे. तर सेवा क्षेत्रानंतर या क्षेत्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करण्यात आलेली आहे. शहर व परिसरातील गृहनिर्माण संस्थांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मागील काही वर्षांपासून स्थापत्य शाखेतून अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. तसेच चांगले व आकर्षक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळत होते. परंतु, यंदाच्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध गृहनिर्माण संस्थांची कामे बंद झाली आहेत. तसेच आर्थिक मंदीमुळे उपलब्ध असणाऱ्या फ्लॅट्सना मागणी कमी असल्याने बांधकामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच स्टीलचे उत्पादन व चीनच्या मंदीचा थेट परिणाम या क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामावर बंदी घालण्यात आली. (प्रतिनिधी)इतर शाखांना मागणी
अभियांत्रिकीच्या इतर शाखांच्या तुलनेत स्थापत्यशाखेतील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट न होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. तुलनेत माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे प्रमाण अधिक आहे. पायाभूत सुविधा प्रधान करणारे प्रकल्प (रस्ते, धरण, विमानतळ, बंदरे) व गृहनिर्माण प्रकल्पात स्थापत्यशास्त्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.