युरोपातील फिनलंड देशात नोकरीची संधी; ज्येष्ठाची तब्बल १६ लाखांची फसवणूक
By विवेक भुसे | Published: March 26, 2024 04:25 PM2024-03-26T16:25:03+5:302024-03-26T16:25:55+5:30
चोरट्यांनी त्यांना बनावट कागदपत्रे पाठविली. नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली
पुणे : युरोपातील फिनलंड येथे नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठाची १६ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रेंज हिल्स खडकी येथील ५८ वर्षीय व्यक्तीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ नोव्हेबर २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. युरोपमधील फिनलंड देशात नोकरीची संधी, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. चोरट्यांनी त्यांना बनावट कागदपत्रे पाठविली. नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली. नोकरीच्या आमिषाने फिर्यादी यांनी ते सांगतील, त्या खात्यांवर पैसे पाठवत गेले. त्यांनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १६ लाख ८० हजार रुपये पाठविले. पैसे जमा केल्यानंतर चोरटे आणखी पैशांची मागणी करु लागले. तेव्हा फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे पोलिस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.