नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे; कार्यकारी समितीची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:47 AM2023-01-31T11:47:55+5:302023-01-31T11:50:17+5:30
उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत...
पुणे :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांना प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने सोमवारी (दि. ३०) मान्यता दिली आहे. आता या आकृतिबंधास प्राधिकरण सभेने मान्यता दिल्यानंतर प्राधिकरणाच्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. या आकृतिबंधानुसार प्राधिकरणात ४०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळसेवेतून भरली जाणार आहेत. उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत.
पीएमआरडीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष व वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त बन्सी गवळी व स्नेहल बर्गे, मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे हे उपस्थित होते. तर पुणे व पिंपरी महापालिकांचे आयुक्त, दोन्ही पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक हे व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे उपस्थित होते.
पूर्वीच्या पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या असून, अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसांना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत पीसीएनडीटीएचे ४० कर्मचारी कार्यरत असून ५० अधिकारी प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत.
सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार १५७ पदे
या बैठकीत प्राधिकरणाच्या आकृतिबंध मान्यतेचा एक टप्पा पूर्ण झाला. मार्चमध्ये होणाऱ्या प्राधिकरण सभेत आकृतिबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्राधिकरणाला स्वत:चे कर्मचारी व अधिकारी भरता येणार आहेत. आकृतिबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदाचे उपमहासंचालक प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने केले. यानुसार एकूण ४०७ पदांच्या आकृतिबंधामध्ये उपअभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक अशी विविध १५७ पदे सरळ सेवा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. उर्वरित पदे पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील.