पुणे महानगरपालिकेचं चाललंय तरी काय? सिंहगड येथे जॉगिंग ट्रॅक कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 10:27 AM2019-06-29T10:27:00+5:302019-06-29T10:37:42+5:30
सिंहगड रस्त्यावरील घटना; जीवितहानी नाही मात्र वाहनांचे नुकसान
नऱ्हे: सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉल लगत महानगरपालिकेने बनविलेला जॉगिंग ट्रॅक सकाळी आठ वाजताच्या सुमारास कोसळला असून सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे महानगरपालिकेने वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल लगत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम बनविली आहे, मात्र भराव टाकून बनविलेली जॉगिंग ट्रॅकची भिंत कालपासून सलग सुरू असलेल्या पावसाने आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी पार्क केलेल्या वाहनांवर भिंत कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ नव्हती, शिवाय जॉगिंग ट्रॅक असणाऱ्या पुढील भागात सायंकाळी भाजी विक्रेते बसत असल्याने त्या भागात गर्दीचे प्रमाण जास्त असते.
पुण्यात रात्री दिडच्या सुमारास कोंढवा परिसरात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. ४ फुट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करुन खोदकाम करण्यात येत होते. वरुन पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जण गाडले गेले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
Mayor of Pune, Mukta Tilak on wall collapse in Kondhwa: An investigation will be conducted into the incident. We are giving a 'work stop' order so that no work can be continued at the construction site here. #Maharashtrapic.twitter.com/LzrODXdkjt
— ANI (@ANI) June 29, 2019
पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.