परिस्थितीशी लढत जोगवा मागून ‘तो’ करतोय इंजिनिअरिंग
By admin | Published: March 25, 2017 03:32 AM2017-03-25T03:32:15+5:302017-03-25T03:32:15+5:30
येथील सिया पाटील हा तृतीयपंथी जोगवा मागून आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. कुटुंबाने अद्याप त्याच्या या रूपास स्वीकारले नसल्याने तीन वर्षांपूर्वी त्याने घर सोडले.
प्रवीण गायकवाड/ शिरूर
येथील सिया पाटील हा तृतीयपंथी जोगवा मागून आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. कुटुंबाने अद्याप त्याच्या या रूपास स्वीकारले नसल्याने तीन वर्षांपूर्वी त्याने घर सोडले.
जोगवा मागून मिळणाऱ्या पैशातून, तसेच साथीदारांच्या मदतीतून त्याने इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण केली असून, आता तो तृतीय वर्षास आहे.
समाजाने आम्हाला आहे तसे स्वीकारले पाहिजे, अशी अपेक्षा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सिया पाटील हे आताचे नाव, मूळ नाव दुसरे. पुरुष म्हणून जन्माला आला म्हणून घरातील मंडळींनी आनंद व्यक्त केला. पाटोदा येथे त्यास शाळेत दाखल करण्यात आले. आठवीत त्याच्या शरीरातील बदलाविषयी त्याला समजले. आपण काहीतरी वेगळे आहोत, याची जाणीव झाली. कुटुंबातील लोकांना सांगितले. मात्र, यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. कसेबसे त्याने तसेच शिक्षण सुरू ठेवले. दहावीला ६८ टक्के गुण मिळवले. पाटोद्यातच अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीतही ७० टक्के गुण मिळवले. शिक्षण सुरू होते; मात्र मानसिक संघर्ष सुरूच होता. कुटुंबच स्वीकारत नाही. मग समाज कसा स्वीकारणार, हा प्रश्न त्याला अस्वस्थ करीत होता. त्याच मन:स्थितीत घर सोडण्याचा
निर्णय घेतला.
संदीप गिरी या जोगत्याशी सियाचा संपर्क आला. त्यास सारे ‘मम्मी’ म्हणून संबोधतात. मम्मीने सहारा दिला. सियाला इंजिनिअरिंग करायचे होते. मम्मीशी सल्लामसलत करून सियाने कुरुंद येथे इंजिनिअरिंग महाविद्यालयात २०१४मध्ये सिव्हिलला प्रवेश घेतला. तत्पूर्वी सियाने सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. पँट-शर्टमध्ये वावरणारा मुलगा साडी नेसू लागला. लांब केस, कपाळाला कुंकू.
घरात लाडात जीवन जगणाऱ्या सियाने जोगवा मागण्यास सुरुवात केली. सहकाऱ्यांसमवेत जोगवा मागण्याबरोबरच देवाचे कार्यक्रमही करू लागला. यातून मिळणाऱ्या पैशातून कॉलेजचे शुल्क भरले, अभ्यासाची पुस्तके घेतली. अर्थात, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मोलाची मदत केली. यातूनच त्याने इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण केली. याच महिन्यात त्याची तिसऱ्या वर्षाची परीक्षा आहे. डिप्लोमा झाल्यानंतर डिग्रीही पूर्ण करण्याचा त्याचा मानस आहे.
‘‘आमचा जन्म हा माणसाचा आहे. मात्र, आमच्याकडे आजही समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. सतत आम्हाला अवहेलना स्वीकारावी लागते. समाजाने हा नकारात्मक दृष्टिकोन बदलला पाहिजे. आम्हाला आहे तसे स्वीकारले पाहिजे.’’ अशी अपेक्षा सिया व्यक्त करते.
संदीप गिरी ऊर्फ मम्मी म्हणाल्या, सियाप्रमाणे माझ्याकडे पाच सहकारी आहेत. मी आईप्रमाणे त्यांचा सांभाळ करतो. चांगले संस्कार, शिकवण देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना व्यसन व इतर वाईट गोष्टींपासून दूर ठेवले आहे.
समाजाने आतातरी आम्हाला समानतेची वागणूक दिली पाहिजे. महाराष्ट्र शासनानेही आम्हाला सोयी-सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा गिरी यांनी व्यक्त केली.