शेतकरी पेन्शनमध्ये सहभागी व्हा! : विभागीय आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:41 PM2019-08-23T12:41:11+5:302019-08-23T12:44:17+5:30
जे शेतकरी या योजनेत भाग घेतील त्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
पुणे : प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेअंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना वयाची साठी उलटल्यानंतर मासिक ३ हजार रुपये निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला देखील त्याचा लाभ मिळेल. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
या योजनेत १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्प भूधारक शेतकरी सहभागी होवू शकतात. जे शेतकरी या योजनेत भाग घेतील त्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र अथवा सामायिक सुविधा केंद्रात सात-बारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबूक घेवून संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी ६६६.स्रे‘े८.ॅङ्म५.्रल्ल या पोर्टलवर सामायिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या शेतकऱ्याला ५५ रुपये तर ४० वर्षांच्या शेतकऱ्याला दोनशे रुपये दरमहा हप्ता द्यावा लागणार आहे. लाभार्थींनी भरलेल्या हप्त्याइतकीच रक्कम केंद्र्र शासन हप्ता म्हणून जमा करणार आहे. अधिक महितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधीत तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
--
यांना लाभ मिळणार नाही
-जमीन धारण करणाऱ्या संस्था
- संवैधानिक पदधारण करणाऱ्या अथवा पदावरील व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी
- सर्व आजी-माजी मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, खासदार, आमदार व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी
- केंद्र व राज्य सरकारचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी-कर्मचारी. ज्यांना दहा हजार प्रती महिना किंवा या पेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या व्यक्ती (चतुर्थ श्रेणी व गट-ड वर्ग कर्मचारी वगळून)
-गत वर्षात आयकर भरलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी
-नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तू शास्त्रज्ञ व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी