येताे का पक्षात ? राज ठाकरेंनी थेट मंचावरुनच दिली "ऑफर"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:21 PM2020-02-04T12:21:57+5:302020-02-04T12:35:59+5:30
पुण्यात व्यंगचित्र कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन साेहळ्यात राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराला थेट पक्षात येण्याची ऑफर दिली.
पुणे : 'झील इन्स्टिट्युट' आणि 'कार्टुनिस्ट कंबाईन' यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याच्या 'इंक अलाइव्ह' या कार्यशाळेचे आयाेजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी झाले. या उद्घाटन समारंभाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित हाेते. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या मनाेगतावेळी थेट मंचावरुनच व्यंगचित्रकाराला पक्षात येण्याची ऑफर दिली.
'इंक अलाइव्ह' या व्यंगचित्राच्या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली. या कार्यक्रमाला विविध व्यंगचित्रकार देखील हजर हाेते. राज ठाकरे यांच्या भाषणाआधी व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी आपले मनाेगत व्यक्त केले. आपल्या मनाेगतात त्यांनी कलेचे महत्त्व विषद करताना शायरीचा देखील आधार घेतला. मिस्त्री यांच्या मनाेगतानंतर राज ठाकरे भाषणासाठी उभे राहिले. मिस्त्री यांच्या मनाेगताने प्रभावित झाल्याने राज ठाकरे यांनी त्यांना मंचावरुन थेट पक्षात येण्याचीच ऑफर दिली. "संजू तू बरा बोलतो हल्ली, येतो का पक्षात ?'' असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. ठाकरे असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे
दरम्यान प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली कला असते. ती प्रत्येकाने जाेपासली पाहीजे, कारण कलेला कुठलिही डिग्री लागत नाही, असे मत देखील ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्याने खास या कार्यक्रमासाठी पुण्यात कुठलेही काम नसताना मुंबईवरुन आल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट करत आपली कलेप्रतीचे प्रेम दाखवून दिले.