आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाहसोहळ्याच्या चौकशीसंदर्भातील चेंडू पोलीस सहआयुक्तांनी स्थानिक पोलिसांच्या कोर्टात सरकवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:32+5:302020-12-24T04:10:32+5:30
पुणे : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संचारबंदीचे आदेश लागू केले जात असताना माळशिरसचे भाजप आमदार राम ...
पुणे : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संचारबंदीचे आदेश लागू केले जात असताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी अतिशय शाही थाटात पक्ष नेत्यांसह हजारो नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा केलेला विवाह सोहळा पुणेकरांच्या टीकेचा धनी ठरला आहे. या विवाहसोहळ्याच्या चौकशीच्या आदेशासंबंधी पोलीस सहआयुक्तांकडे विचारणा केली असता त्यांनी स्थानिक पोलिसांच्या कोर्टात चेंडू सरकवला. दरम्यान, अलंकार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या सोहळ्याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले.
आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याला शेकडो लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे पाहायला मिळाले. सोहळ्याला मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे सुरक्षित अंतर देखील पाळले गेले नाही. या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्न सोहळ्यासाठी सामान्य लोकांना केवळ ५० लोकांची मर्यादा असताना राजकीय लोकांना नियम लागू होत नाहीत का? अशी सर्वत्र टीका सुरू झाली. या सोहळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत का? याविषयी पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मी असे कोणतेच आदेश दिलेले नाहीत. स्थानिक पोलिस त्यांच्या परीने काय ती चौकशी करतील असे त्यांनी '''''''' लोकमत'''''''' शी बोलताना सांगितले.
...
मी स्वतः त्या विवाह सोहळ्याला हजर होतो.गर्दी फारशी नव्हती. लोक येत जात होते. अजूनतरी कुणी या सोहळ्याबाबत तक्रार केलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी केली जाईल.
- संजीवन जगदाळे, पोलीस निरीक्षक,अलंकार पोलीस ठाणे