पुणे महापालिकेच्या २४ तास पाणी योजनेच्या निविदेत ‘जाँइट व्हेन्चर’; राष्ट्रवादीने वाटले पेढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:42 PM2017-12-16T16:42:47+5:302017-12-16T16:47:06+5:30
२४ तास पाणी योजनेच्या निविदेत जाँइट व्हेन्चर करण्याची परवानगी मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
पुणे : २४ तास पाणी योजनेच्या निविदेत जाँइट व्हेन्चर (भागीदारी करून दोन कंपन्यांना एकत्रितपणे निविदा दाखल करण्याची व्यवस्था) करण्याची परवानगी मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे नगरसेवक सुनील टिंगरे व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. आमच्याच आंदोलनामुळे प्रशासन व पदाधिकारी यांना ही सुबुद्धी सुचली असल्याचा दावा तुपे यांनी यावेळी केला. पुणेकरांचे काही कोटी रुपये यामुळे वाचणार आहेत, असे ते म्हणाले.
३ हजार १०० कोटी रुपयांच्या कामाची ही योजना निविदा स्तरावरच वादग्रस्त झाली आहे. विरोधकांनी व प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केल्यामुळे या कामाची पहिली निविदा रद्द करण्यात आली आहे. आता फेरनिविदा काढली आहे व त्यावरही विरोधकांनी अनेक आक्षेप नोंदवले आहेत. सत्ताधारी भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून फेरनिविदा रद्द करावी, अशी मागणी केली आहे. २८ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत आहे.