"अजितदादा, पालकमंत्री या नात्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर काही बोलाल का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:28 PM2020-09-02T14:28:25+5:302020-09-02T15:54:31+5:30
पुण्यातील आरोग्य यंत्रणांमधील सावळा गोंधळ सुरूच असून कोरोनाबाधितांचा जीव टांगणीलाच असल्याचे सिद्ध
पुणे : मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार होता. हा दरबार संपल्यानंतर यावेळी उपस्थित पत्रकारांनी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत पालकमंत्री या नात्याने प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच अजितदादा निघून गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी सुरु होत्या.अजित पवार यांच्या असंवेदनशीलतेवर चर्चा सुरू आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनावर वेळेवर उपचार न मिळाल्याने बुधवारी( दि.२) पहाटे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर कोविडच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील असेही सांगितले होते. मात्र , तरीदेखील आरोग्य यंत्रणांमधील सावळा गोंधळ सुरूच असून कोरोनाबाधितांचा जीव टांगणीलाच असल्याचे सिद्ध झाले. पुण्यातील आरोग्य यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरची दिरंगाई याचा फटका एका पत्रकाराला बसला. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पुण्यातील पत्रकार रायकर यांना आपला जीव गमवावा लागला.
रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. त्यानंतर २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी पण केली जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव गावी गेले. मात्र तिथेही त्यांचा त्रास सुरूच राहिला.त्यामुळे त्यांनी कोपरगावमधे अँटिजेन टेस्ट केली तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर रविवारी ३० जुलैला रात्री त्यांना रुग्णवाहिका उपचारांसाठी पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधे भरती केले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. मंगळवारी त्यांची ऑक्सिजनपातळी खूपच खालावली होती.त्यांना जम्बो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक अँम्ब्युलन्सची गरज होती. पण ती रुग्णवाहिका मिळवण्यासाठी मंगळवारी रात्री प्रयत्न सुरू होते . त्यानंतर एक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटिलेटर खराब झाला असल्याचे सांगण्यात आले. दुसरी रग्णवाहिका मिळाली पण त्यात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा सव्वाबारा वाजून गेले होते. पहाटे चारच्या सुमारास रुग्णवाहिका मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आणि आयसीयुमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला.
पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत उशीर झाला होता. यंत्रणांमधील समन्वयाचा अभावामुळे रायकर यांना आपला जीव गमवावा लागला.