Maharashtra | मान्सून परतीचा महाराष्ट्रातील प्रवास लांबला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:47 AM2022-10-11T10:47:06+5:302022-10-11T10:49:10+5:30
ऑक्टोबरनंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे...
पुणे : तमिळनाडूपासून राजस्थानपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात मान्सून सक्रिय असून कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे, तर विदर्भातही पुढील दोन दिवस पाऊस पडेल. साधारण १५ ऑक्टोबरनंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे.
उत्तर तमिळनाडूपासून ईशान्य राजस्थानपर्यंत एक द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मान्सून अधिक सक्रिय राहील, अशी शक्यता असल्याची माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली, तर विदर्भातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. १३-१४ तारखेनंतर मात्र आर्द्रतेचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे पाऊस कमी होईल, तर साधारण १५ ऑक्टोबरनंतर मान्सूनचा पुढील परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागातून हा परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज असल्याचेही ते म्हणाले.
पुण्यातही पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर सायंकाळी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह एक ते दोन जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास शहराला जोरदार पावसाने झोडपले. गेले दोन दिवस वातावरण ढगाळ असले तरी पाऊस नव्हता. त्यामुळे सोमवारी आलेल्या अचानक पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) : शिवाजीनगर १०.७, पाषाण २३, मगरपट्टा २९, चिंचवड ११.५, लवळे ७.५, तर आशय मेझरमेंटने केलेली नोंद (मिमीमध्ये) : कात्रज ४१.२, खडकवासला ५८, वारजे २९.