दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडला चित्रपटाचा प्रवास, मधुर भांडारकर यांच्याशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 04:30 PM2017-11-05T16:30:48+5:302017-11-05T16:31:04+5:30

पुणे : चित्रपटाच्या प्रक्रियेमध्ये पटकथा, संशोधन, संपादन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. चित्रपटाचा विषय हा एक विचार असतो. त्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी अभ्यास, संशोधन खूप गरजेचे असते.

The journey of the film to Udalgad from the view of the director, and the dialogue with Madhur Bhandarkar | दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडला चित्रपटाचा प्रवास, मधुर भांडारकर यांच्याशी संवाद

दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडला चित्रपटाचा प्रवास, मधुर भांडारकर यांच्याशी संवाद

Next

पुणे : चित्रपटाच्या प्रक्रियेमध्ये पटकथा, संशोधन, संपादन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. चित्रपटाचा विषय हा एक विचार असतो. त्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी अभ्यास, संशोधन खूप गरजेचे असते. हा विचार दोन-अडीच तासात चपखल बसवणे आव्हानात्मक असते. ते कसब दिगदर्शकाला अवगत असावे लागते. चित्रपटाच्या यशातून दिग्दर्शकाला समाधान मिळतेच; मात्र, यशापयशाच्या गणिताबरोबरच चित्रपट बजेटमध्ये बसवणे जास्त गरजेचे असते. बजेटचे आणि यशापयशाचे गणित यांच्यात समतोल साधता यायला हवा, असा शब्दांत प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी चित्रपटाचा प्रवास दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडला. इंदू सरकारच्या वेळी प्रचंड ताण आणि त्रासाचा सामना करावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सदाशिव अमरापूरकर स्मृती सोहळ्यात मधुर भांडारकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ही मुलाखत पार पडली. एखादा चित्रपट सुचवण्यापासून, तो प्रदर्शित होण्यापर्यंतचा एका संवेदनशील दिग्दर्शकाचा प्रवास यानिमित्ताने उलगडला. दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर यांनी भांडारकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सुनंदा अमरापूरकर यांची आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दाखवण्यात आलेल्या चित्रफितीतून सदाशिव अमरापूरकर यांची छोट्या पडद्यासह हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील वाटचाल, सामाजिक बांधिलकी आदी आठवणींना उजाळा मिळाला.

भांडारकर म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडियाचा प्रभाव, कलाकारांचे बजेट वाढले आहे. चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच प्रमोशन, मार्केटिंगलाही अनन्यसाधारण महत्व आले आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवण्यासाठी आशयपूर्ण चांगल्या चित्रपटांची गरज असते. आशय दर्जेदार असेल तर कमी बजेटचे चित्रपटही यशस्वी होतात. थिएटर्सची वाढती संख्या, परदेशातील प्रेक्षकांचे वाढते प्रमाण यामुळे उदयोन्मुख निर्माते, दिग्दर्शकांसाठी चित्रसृष्टीचे भविष्यातील चित्र आशादायी आहे. लहानपणापासून असलेले चित्रपटांचे वेड, व्हिडिओ कॅसेटचा डिलीव्हरी बॉय म्हणून केलेले काम, त्रिशक्ती चित्रपटाला मिळालेले अपयश. त्यातून आलेले नैराश्य, चित्रपट चालला नाही तरी तू नक्की चालशील, असे सांगत सदाशिव अमरापूरकरांनी टाकलेला विश्वास, अशा अनेक बाबींवर भांडारकर यांनी प्रकाश टाकला. त्रिशक्ती नंतर ४-५ महिन्यांनी चांदनी बार हा चित्रपट मिळाला. तब्बूसह सर्वांनी दिलेला विश्वास आणि मेहनतीमुळे या चित्रपटाने माझे नशीब पालटले. ट्राफिक सिग्नल चित्रपटाची निर्मिती प्रक्रियाही त्यांनी उलगडून सांगितली.

अनिल अवचट म्हणाले, 'सदाशिवचे जाणे म्हणजे माज्यातील अस्तित्वाचा लचका तुटण्यासारखेच होते. तो अत्यन्त संवेदनशील, मनमिळाऊ व्यक्ती होता. पोटतिडकीने काम करण्याची आणि कोणाचेही चांगले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्याची इच्छा असायची. त्याने मला आईचे प्रेम दिले. त्यामुळे आजही त्याच्या आठवणीने डोळे पाणावतात.' रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ नेपथ्यककार बाबा पार्सेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा यावेळी विनोद तावडे यांनी केली. १६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू ९० व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्त त्यांना सर्वांंनी उभे राहून मानवंदना दिली. तावडे म्हणाले, काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे कळत असल्याने मुख्यमंत्र्यानी मला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पार पडत असतानाही तरीही सगळ्यांना तावडेंचे वावडे आहे. शिक्षक संघटनांनी वेतन श्रेणीतील वाढीसाठी मोर्चे काढले. मात्र, गुणवत्ता सिध्दीला विरोध करणे चुकीचे आहे. मी शिक्षक मंत्री नसून शिक्षण मंत्री आहे. त्यामुळे शैैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल.

सत्ता आणि जबाबदारी यांचे गणित उलगडताना भांडारकर म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष राज्याच्या हिताचे निर्णय घेत असेल आणि राज्याची प्रगती होत असेल, तर माझा त्यांना नक्कीच पाठिंबा असेल. देशाचे ऐक्य आणि विकास या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. सध्याचे सरकार योग्य दिशेने काम करत आहे. विकासाची जबाबदारी सरकारप्रमाणेच सामान्यांचीही असते. शासन यंत्रणा बदलण्याची, सुधारण्याची ताकद प्रत्येक सामान्य माणसामध्ये असते. त्यासाठी त्याने या प्रक्रियेत आपले योगदान दिले पाहिजे.

Web Title: The journey of the film to Udalgad from the view of the director, and the dialogue with Madhur Bhandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.