धामणीची म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:17 AM2021-02-28T04:17:20+5:302021-02-28T04:17:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंचर : पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी (ता. आंबेगांव) येथील श्रीक्षेत्र म्हाळसाकांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी (ता. आंबेगांव) येथील श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा प्रशासनाच्या आदेशानुसार यंदा कोरोनामुळ रद्द झाल्याने दर वर्षी लाखो भाविकांच्या गर्दीने फुलणारा गड शनिवारी सुनासुना होता. गेल्या अनेक वर्षाची परंपरा कोरोनामुळे यंदा खंडित झाल्याने भाविकभक्तांच्या व लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या आनंदावर विरजण पडले.
जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान यात्रोत्सव माघ पौर्णिंमेनिमित्त २७ व २८ फेब्रुवारी दरम्यान भाविकांविना साजरा होत आहे. यंदा कोरोनामुळे प्रशासनाने यात्रा रद्द केली. परंतु, दर वर्षीच्या प्रथेप्रमाणे शनिवारी पहाटे ४ वाजता श्री खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तलिंगाचा पंचामृताने अभिषेक देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे, भगत मंडळी यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर सप्तलिंगावर साधारण दोन फूट उंच व दीड फूट रुंद व्यासाच्या पंचधातूच्या आकर्षक मुखवट्याची प्रतिष्ठापना तांबे, भगत या सेवेकरी मंडळीनी केली. पहाटे पांचच्या सुमारास सेवेकरी दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, धोंडीबा तांबे, प्रभाकर भगत, नामदेव भगत, शांताराम भगत, राजेश भगत यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवाचे पुजारी,भगत मंडळीनी आणलेला पंचपक्वान्नांचा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला.
दर वर्षी मुंबई, पुणे व नगर जित्हयातून लाखो भाविक धामणीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. अनेक भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा मंदिराचे आवारात पांच नामाचे जागरणाचे कार्यक्रम केले जातात. परंतु, ही अनेक वर्षे सुरु असलेली परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली. यावेळी जागरणे झाली नसल्याचे वाघेवीर मंडळीनी सांगितले. मंदिर परिसरात मंचर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केलेली होती. मंदीर व देवाचे दर्शन बंद असल्याचे माहितीचे फलक धामणी ग्रामस्थाच्या वतीने मुख्य ठिकाणी लावलेले होते. सकाळी नऊ वाजता मोजक्या ग्रामस्थानी देवाचे हारतुरे वाजत गाजत आणून मंदिरात देवाला अर्पण करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने निरनिराळ्या ठिकाणाहून विविध दुकाने, लहानमोठे व्यावसायिक दरवर्षी यात्रेत आवर्जुन येतात. परंतु कोरोनामुळे सगळे बंद असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
चौकट
भक्ताच्या गर्दीने फुलणारे मंदीराचे माळरान कोरोनामुळे निर्मनुष्य असल्याचे जाणवले. तसेच गावडेवाडी, महाळूंगे पडवळ व परिसरातील अनेक गांवातून भाविकभक्त आपापल्या बैलगाड्या जुंपून दरवर्षी येत असतात व मंदिर परिसरातील शेतामध्ये आपल्या बैलगाड्यासह मुक्कामाला असतात. परंतु यंदा मंदिर परिसरात एकही बैलगाडी आली नव्हती.
फोटोखाली: धामणी परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.