‘हाय एक्स्प्लोझिव्ह’ वाहनांतून होतोय नव्या नोटांचा प्रवास
By admin | Published: November 10, 2016 01:23 AM2016-11-10T01:23:37+5:302016-11-10T01:23:37+5:30
संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना थांगपत्ताही लागणार नाही, अशा पद्धतीने गोपनीयता बाळगून अतिज्वलनशील पदार्थ वाहतुकीच्या वाहनांमधून
पिंपरी : संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना थांगपत्ताही लागणार नाही, अशा पद्धतीने गोपनीयता बाळगून अतिज्वलनशील पदार्थ वाहतुकीच्या वाहनांमधून विविध बँकांमध्ये भरणा करण्यासाठी नव्या नोटा नेण्यात आल्या. बँकेच्या जवळ आल्यानंतर ‘हाय एक्स्प्लोझिव्ह’ असा उल्लेख असलेल्या वाहनांतून नोटा आणल्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ज्या वेळी बँकेजवळ मोटार थांबली, त्या वेळी संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्याचा नेमका उलगडा झाला.
मंगळवारी रात्री आठला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार, पाचशेच्या नोटा मध्यरात्रीपासून बाद होणार असे जाहीर केले. नव्या नोटा दोन दिवसांत चलनात येतील, असे स्पष्ट करून बँका एक दिवस बंद राहतील, असे नमूद केले. त्यामुळे बँकांची शटर बंद होती. परंतु बँकांमधील कामकाज सुरू असल्याचे दिसून आले.
चलनातून हजार, पाचशेंच्या नोटा बाद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हजार, पाचशेच्या सध्याच्या नोटा ७२ तासापर्यंत चलनात रहातील. परंतु केवळ औषध दुकानांत औषधे खरेदीसाठी तसेच शासकीय रूग्णालयात रूग्णसेवेचे बील अदा करण्यासाठी त्या चलनात येऊ शकतील येतील. असे स्पष्ट केले होते. भाजी विक्रेत्यांपासुन ते किराणा मालाच्या दुकानांपर्यंत किरेकोळ वस्तू खरेदी करताना, सुटे पैसे उपलब्ध होत नव्हते. दुकानदार पाचशे, हजाराच्या पटीत माल खरेदी केला तरच नोटा स्वीकारत आहेत. (प्रतिनिधी)