आत्मशोधाचा स्वरमयी प्रवास

By admin | Published: February 6, 2015 11:35 PM2015-02-06T23:35:34+5:302015-02-06T23:35:34+5:30

संगीतातील परंपरागत अशा सांगितिक परिभाषेला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न मोजके गायकच करू पाहतात.

The journey of self-discipline | आत्मशोधाचा स्वरमयी प्रवास

आत्मशोधाचा स्वरमयी प्रवास

Next

र, लय, लालित्य आणि अभिजातता असा स्वत:चा एक अनुबंध चांगल्या गायकात असतोच. पण भारतीय अभिजात संगीतातील परंपरागत अशा सांगितिक परिभाषेला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न मोजके गायकच करू पाहतात. त्यातील ठळकपणे नाव घेता येईल असा ’गानहिरा’ म्हणजे पं. सत्यशील देशपांडे. एक उत्तम गायक एवढीच संगीताची कार्यसीमा सिमित न ठेवता, सांगितीक घराण्यांचा तौलनिक अभ्यास - संशोधन करून संगीताकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार त्यांनी नव्या पिढीला दिला. आज डॉक्युमेंटेशनच्या रूपात सांगितिक घराण्यांमधील विविध गायकांच्या अभिजात गायकींची वैशिष्ट्ये त्यांनी जतन करून ठेवली आहेत. भारतीय अभिजात संगीताला दिलेले अत्यंत मोलाचे आणि एका वेगळ््या उंचीवर घेऊन जाणारे हे योगदान आणि त्यांची सांगितीक वाटचाल त्यांच्याच शब्दांत...
घरात 'घरदांज गायकी’चे वातावरण. वडिल वामनराव देशपांडे यांच्याकडे संगीताचे व्याकरण सांगणारी नोटेशनची पुस्तके होती, एका अर्थाने विशेषणांनी ओतप्रोत भरलेले असे ते लिखाण. केसरबाईंचा पंचम ऐकल्यावर कानात कुणीतरी अमृतरस ओतल्याचा भास होतो असे कुण्या एका समीक्षकाने म्हटल्याचे वाचनात आले होते, पण तेव्हा नेमके कळत नव्हते की त्या पंचमची 'क्वालिटी' आहे तरी काय?
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील घराणी हा एक सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन आहे, त्याला एक विश्लेषणात्मक मूल्य आहे. त्यावेळी संपर्क माध्यमं नव्हती. आग्रा, लखनौ, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी होती. त्यामुळे घराण्यांचेही वेगवेगळे 'मिजाज' पहायला मिळायचे. वेगवेगळ्या भौगोलिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये ही घराणी निर्माण झाली तेव्हा दोन घराण्यांमधल्या प्रतिभाही भिन्न असणे ओघाने आलेच. वसंतराव देशपांडे हे जेव्हा ‘घरंदाज गायकी’ लिहित होते, त्यावेळी विशिष्ट अशी सांगितिक परिभाषा नव्हती. त्यामुळे मग त्यांनी बा. सी. मर्ढेकर, सुझान लँण्डर यासारख्या लेखकांची भाषा वापरली, तरीही एक माध्यम दुसऱ्या माध्यमातून उलगडण्याला अंगभूत मर्यादा आहेतच. चित्र तुम्ही संगीतातून किती आणि कसे सांगणार? त्यामुळे मला जे संगीताचे बाळकडू मिळाले ते वडिलांच्या घरंदाज गायकीच्या प्रकरणांतूनच. त्या काळात मोठे मोठे गायक, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, विं. दा. करंदीकर, रा. भि. पाटणकर अशा प्रतिभावंतांची घरी ऊठबस असे. संगीताची विशिष्ट परिभाषा नसल्याने वडिलांच्या लेखनाचे सर्वांनाच अप्रुप. मी तेव्हा दहा-बारा वर्षांचा असेन, त्यावेळी हा मालकंस असा नाही-असा आहे? ही जी भांडणे व्हायची ती गाऊनच व्हायची. तेच संस्कार माझ्या बालमनावर नकळतपणे झाले. तो संस्कार महत्वाचा अशासाठी की, एका रागाकडे पाहण्याचे व समजून घेण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. एकाच गुरूकडे शिकून कधी एकच असा दृष्टिकोन मिळत नाही. आपलेच बरोबर आहे असे शिष्याला कधी वाटत नाही. माझे वडिल हे सुरेशबाबू माने यांचे शिष्य असल्याने मोगूबाई कुर्डीकर, भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व अशा सगळ्यांचाच घरी वावर होता. मला पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीने भुरळ घातली. त्यांच्या गायकीत एक रहस्य दडलेले होते. ताल तर तोच, रागही तोच मग तरीही त्यांचे गाणे नवीन का वाटते? असा प्रश्न मला वारंवार पडायचा. सगळं समजत असूनही त्यांच्या गायनातील अनाकलनीयतेने मला त्यांच्याकडे आकर्षित केले. मी त्यांच्याकडे शिकायला गेलो. सुट्टीत कुमारजी मला बोलवून घ्यायचे. त्यांच्याबरोबर संपूर्ण भारतभर फिरायला मिळाले. त्यामुळे सांगितिक संस्कृती मला जवळून पाहायला मिळाली.
लहानवयापासून महाविद्यालयापर्यंत अनेक छोटे मोठे कार्यक्रम करत होतो. वाणिज्य शाखेची पदवी मिळविली, इंटर सीए झालो. वडिलांची सीएची फर्म होती, पण तिथे मन रमणार नव्हते. संगीत हाच जीवनाचा मार्ग मनाशी निश्चित झालेला होता. बीकॉमला आॅनर्स असल्यामुळे माझ्याकडे क्षमता होती तेव्हा वडिलांनी समजावून पाहिले. पण माझी संगीतातील ओढ लक्षात आल्यानंतर मात्र मला प्रोत्साहनच दिले. मग मी कुमारजींकडेच राहिलो. मला आणि मुकुल शिवपुत्रला शिकविताना त्यांच्या डोक्यात घराणे हा विचार कधीच नव्हता. ज्या पारंपारिक आणि सांगितिक मूल्यांवर आपली गायकी त्यांनी फुलविली त्याचेच शिक्षणच त्यांनी आम्हाला दिले, गुरू म्हणून ही खरोखर फार मोठी गोष्ट होती. आमची समज वाढावी, त्यांचे गायन कळायला तुम्हाला इतर कुणी या रागाच्या बंदिशीमध्ये काय केलंय हे आधी कळावं अशी त्यांची धडपड होती. तीन वर्षांनी संगीताचे रितसर धडे घेऊन बाहेर पडलो. कुमारजींशी संपर्कात होतोच.
संवाद फाउंडेशन या संस्थेला १९८८ च्या सुमारास अभिजात भारतीय संगीतातील दुर्मिळ आणि कालातीत मौखिक गायन परंपरेचे जतन करण्यासाठी फोर्ड फाउंडेशनचे एकरकमी अनुदान मिळाले. यानिमित्ताने संगीत क्षेत्रातील सर्व उत्तर भारतीय कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्याचे डॉक्युमेंटेशन करता आले. त्यामुळे सांगितिक आदान प्रदान झाले. प्रतिथयश गायक पं. कुमार गंधर्व, पं. जसराज, किशोरीताई आमोणकर यांचे डॉक्यूमेंटेश झाले होते. पण पं. रामाश्रय झा, देवधर यांचे डॉक्युमेंटेशन यापूर्वी कुणीच केले नव्हते. ते यानिमित्ताने करता आले. या साऱ्या प्रथितयश गायकांनी परंपरा जपताना त्यातूनच नवनिर्मिती केली, हे मी अभ्यासातून सांगू शकतो. भारतातील अनेक विद्यापीठांच्या सांगितिक विभागामध्ये या डॉक्यूमेंटेशनचा उपयोग शैक्षणिक सामुग्री म्हणून केला जातो. यातून सांगितिक शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा असा प्रयत्न आहे. शैक्षणिक सामुग्री म्हणून एक डॉक्यूमेंटेशन तयार झाले आहे. जे साधारणपणे गायक कुणी करीत नाही, मात्र तेच माझ्या जीवनाचे सार आहे. त्यातूनच माझी अनोखी सांगितिक शैली आणि प्रतिभा तयार झाली आहे. अशीच इतर गायकांची तयार व्हायला हवी. विविध विद्यापीठात जी व्याख्याने होतात तिथे प्रात्यक्षिकासह सादरीकरणावर नेहमीच भर देण्याचा प्रयत्न करतो. परंतु या घराण्यांच्या गायकीच्या अभ्यासाच्या निमित्ताने माझ्या सांगितिक व्यक्तिमत्वाला अनेक पदर मिळाले. हे तसे खूप दुर्मिळ उदाहरण. संगीताकडे पाहण्याचा तात्विक दृष्टिकोन तयार झाला.

आवड ज्ञानशाखांची... पिंड अभ्यासकाचा
लेखनाच्या सुरूवातीचा काळ उलगडताना, साहित्य संस्क्ृती महामंडळाचे प्रा. बारलिंगे यांनी ज्ञानकोशासाठी लिहिण्याविषयी सुचविले होते, तेव्हा मी नकार दिला. गळ्यातून सूर निघणे बंद होईल तेव्हा लेखनाकडे वळेन असे त्यांना सांगितले होते. अनेक ज्ञानशाखांची मला आवड आहे, पण तत्वज्ञानाचा अंदाज येईल, विषयाचा आवाका कळेल अशी काही पुस्तके सुचवाल का? असे मी बारलिंगे यांना विचारले असता त्यांनी ‘अँलिस इन वंडरलँंड’ वाचण्यासाठी प्रेरित केले होते. त्यातून तत्त्वज्ञानाविषयी एक नवी दृष्टी मिळाली. मग रॉबिन्सन क्रूस, सिंधबाद सेलर, यामाध्यमातून एका संस्कृतीला दुस-या संस्कृतीबद्दल काय वाटते हे देखील जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मग आग्रा घराण्यातील लोकांना ते गाणे का आवडत होते, त्यांच्या भावविश्वातून जाऊन विचार करणे. याचा फायदा डॉक्यूमेंटेशन करताना झाला. यातून एक सांस्कृतिक व्याप्ती वाढली आणि अनेक भाषांमध्ये लिहिता आले. लेखनाचा सूर गवसला आणि एक नवा वाचक वर्ग विकसित झाला.

...असे चौमुखी गवय्ये
पूर्वी जे चौमुखी गवय्ये असायचे त्यांना मोठे गवई म्हटले जायचे. भास्करबुवा बखले हे त्यातलेच. बखले यांनी फैज महम्मद खाँ यांना सांगितले होते, की ''आता माझ्याकडची सगळी विद्या संपली तू नथ्थूकंचन यांच्याकडे जा.'' अल्लादियॉं खॉं, गजाननबुवा जोशी या मातब्बरांनीही त्यांच्या शिष्यांना त्या त्या घराण्यांचा अभ्यास शिकविला. म्हणूनच त्यांना चौमुखी गवय्ये म्हणतात.

आज आपली सांगितिक परिस्थिती अशी आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार संगीताचे धडे दिले जातात. अभ्यासक्रमात अनेकदा सूचित केलेले संदर्भसाहित्यही असते पण त्याकडे लक्षच दिले जात नाही. गुरू म्हणतो माझ्यासारखी बंदिश गा, शिष्य गात राहतो. इतके कशाला, दुसऱ्या घराण्याचे ऐकले तर कान खराब होतील, असे आत्ता आत्तापर्यंत सांगितले जायचे. शिष्याच्या आवाजाला गुरूच्या आवाजाचे वळण लागले तर सांगितिक विचार पुढे येत नाहीत.
गुरू कोणीही असो, पण तोडी राग वेगवेगळ्या गायकांनी कसा गायला आहे, हे सांगण्याची तरतूद कोणत्याही अभ्यासक्रमात नाही. ती असायला हवी. माझ्या विद्यार्थ्यांना मी माझ्या तोडीसह इतरही गायकांची तोडी ऐकण्यास सांगतो.

Web Title: The journey of self-discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.