मोठ्या खेळीचा आनंदच वेगळा
By admin | Published: May 26, 2017 03:24 AM2017-05-26T03:24:07+5:302017-05-26T03:24:07+5:30
गेल्या दीड महिन्याच्या आयपीएल सत्रात मला जो काही अनुभव मिळाला, तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये बदल घडविणारा आणि मुख्य म्हणजे माझा आत्मविश्वास वाढविणारा होता
शिवाजी गोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेल्या दीड महिन्याच्या आयपीएल सत्रात मला जो काही अनुभव मिळाला, तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये बदल घडविणारा आणि मुख्य म्हणजे माझा आत्मविश्वास वाढविणारा होता, असे रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, बेन स्टोक यांच्याबरोबर खेळताना कसे वाटले, असे विचारले असता राहुल म्हणाला, ‘‘या सगळ्यांची फलंदाजीची, क्षेत्ररक्षणाची शैली वेगवेगळी आहे. यांच्याबरोबर खेळताना मला जो काही अनुभव मिळाला, ती माझी आयुष्याची पुंजी ठरणार आहे. या सर्वांकडून फलंदाजीच्या वेळी खेळपट्टीवर असताना ज्या मला लहानसहान गोष्टींची जाणीव करून देत होते त्याचा मला भावी क्रिकेट आयुष्यात नक्कीच फायदा होईल. एवढ्या उच्च दर्जाचे खेळाडू आपल्या ज्युनिअर सहकाऱ्याला कसे समजून आणि सांभाळून घेतात, याचासुद्धा अनुभव खूपच सुखद होता. माझ्या प्रत्येक खेळीच्या वेळी स्मिथ, रहाणे, धोनी, स्टोक यांच्याकडून ज्या टिप्स मिळाल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या.’’
मार्गदर्शक स्टीफन फ्लेमिंग व हृषीकेश कानेटकर यांच्याबाबत विचारले असता राहुल म्हणाला, ‘‘फ्लेमिंग सर तर ग्रेटच होते. त्यांचा प्रत्येक खेळाडूकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. या खेळाडूकडून आपण उत्कृष्ट खेळी कशी करून घेऊ, याचा ते बारकाईने अभ्यास करीत. फलंदाजीच्या वेळी होत असलेल्या बारीक-बारीक चुकांकडे त्यांचे लक्ष होते आणि त्या चुका कशा सुधारता येतील, याचे ते योग्य मार्गदर्शन करीत. फलंदाजीच्या वेळी कोणता गोलंदाज कोणत्या प्रकारे गोलंदाजी टाकेल आणि ते कसे ओळखायचे, हेसुद्धा या दिग्गज खेळाडूंकडून मला शिकायला मिळाले.’’
उत्कृष्ट खेळाडू जर व्हायचे असेल, तर सर्वप्रथम आपली तंदुरुस्ती सिद्ध करायला हवी, असे सुद्धा फ्लेमिंग सर सांगायचे.
वयाच्या १३व्या वर्षापासून डेक्कन जिमखाना संघाकडून खेळणाऱ्या राहुलला शतक हुकल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘मी ज्या वेळी फलंदाजीला गेलो त्यावेळी मनात धावा करू शकेल, असे कधीच वाटले नव्हते. पण, सुरुवातीला समोर असलेल्या अजिंक्य रहाणेने जे मार्गदर्शन केले आणि संयमाने फलंदाजी करण्यास सांगितले तेव्हा मी ९३ धावांपर्यंत मजल मारली. शतक हुकल्याचे मला थोडे दु:ख होते; पण मोठी खेळी केल्याचा आनंद एक वेगळाच होता.’’