Maratha Reservation: आरक्षणाच्या निर्णयानंतर पुणे शहरात व उपनगरात मराठा बांधवांचा जल्लोष
By अजित घस्ते | Published: January 27, 2024 04:34 PM2024-01-27T16:34:36+5:302024-01-27T16:39:57+5:30
पुणे शहरात व उपनगरात चौका-चौकात गुलाल उधळून व फटाकेबाजी करीत जल्लोष करण्यात आला.....
पुणे : मनोज जरांगे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात शिंदे सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे पुणे शहरात व उपनगरात चौका-चौकात गुलाल उधळून व फटाकेबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
यावेळी लाल महल, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, स्वारगेट चौका, शिवाजीनगर, कर्वे रस्ता, कोथरूड आदी परिसरात फटाके बाजी डिजे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणाचा हा ऐतिसाहसिक विजय असल्याच्या भावना ही नागरिकांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षण लढा दिला आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ते पुढे कायद्याच्या चौकटीत बसून ते टिकावे यासाठी पक्षाच्यावतीने कायम आमच्या शुभेच्छा आहेत. सरकारनं मान्य केले खरे पण पुढे हे टिकवणे ही गरजेचे आहे.
- अरविंद शिंदे, अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पुणे शहर
आजही अनेक गरीब मराठा बांधव मार्केटयार्डात काबाड कष्ट, भाजी विक्रीपासून हमाल पर्यंत काम करीत आहेत. अशा आर्थिक निकषावर खऱ्या मराठा बांधवांना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. त्यात शैक्षणिक दृष्टीने फार महत्वाचे होते. विद्यार्थाना याचा फायदा होणार आहे. यासाठी मार्केटयार्डात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
- गणेश घुले संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड