सेरेब्रल पाल्सीला झुगारून न्यायाधीशपदापर्यंत 'बाजी' मारणाऱ्या निखीलची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 04:56 PM2020-01-29T16:56:06+5:302020-01-29T17:14:03+5:30

उत्तुंग ध्येय असणाऱ्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी कष्ट आणि सातत्याच्या जोरावर ते शिखरावर पोहोचतातच. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे पुण्यातल्या निखील बाजीची.

Judge Nikhil Baji inspirational journey overcoming cerebral palsy | सेरेब्रल पाल्सीला झुगारून न्यायाधीशपदापर्यंत 'बाजी' मारणाऱ्या निखीलची गोष्ट

सेरेब्रल पाल्सीला झुगारून न्यायाधीशपदापर्यंत 'बाजी' मारणाऱ्या निखीलची गोष्ट

googlenewsNext

पुणे : उत्तुंग ध्येय असणाऱ्यांच्या वाटेत कितीही काटे आले तरी कष्ट आणि सातत्याच्या जोरावर ते शिखरावर पोहोचतातच. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे पुण्यातल्या निखील बाजीची. सेरेब्रल पाल्सीसारख्या कधी बरं न होणाऱ्या आजाराला न घाबरता त्याने न्यायाधीशपदापर्यंत मजल मारली आहे. त्याचे हे यश खचलेल्या प्रत्येकाला नवी उमेद देणारे आहे. 

निखीलचा जन्म झाल्यावर काही महिन्यांनी त्याच्या आई कांचन बाजी यांना तो कमी हालचाल करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकही महिन्यात त्याच्या आजाराचे निदान झाले. पण त्याही स्थितीत संतुलन न ढळू देता कुटुंबीयांनी फिजिओथेरपीचे उपचार सुरु ठेवले. आजूबाजूचे अनेक जण विविध सल्ले देत असत, आगंतुक विचारणा करत असत पण या सगळ्याकडे फार लक्ष न देता आपला मुलगा हा नॉर्मलच आहे असा विचार करत त्यांनी त्याला नॉर्मल शाळेत घालण्याचे ठरवले. अनेक शाळांनी नाकारल्यावर त्याला डॉ शामराव कलमाडी शाळेत प्रवेश मिळाला. शाळेतले सर्वसामान्य मुलांप्रमाणे मिळणारी वागणूक बघून त्याची जडणघडण होत होती.अगदी इतर मित्रांप्रमाणे दोन चाकी नसली चार चाकीसायकलवरून तो शाळेत जायचा. दहावीला ७८ तर बारावीला ७९ टक्के इतके घसघशीत यश त्याने संपादन केले. त्यानंतर त्याने  गुजरात येथील गांधीनगरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्या देशभर होणाऱ्या प्रवेश परीक्षेत तो निवडला गेला होता. घरापासून पाच वर्ष लांब राहून त्याने स्वतःच्या बळावर पदवी मिळवली. 

मात्र पदवी मिळाल्यावर नोकरी मिळवताना त्याला अनेकदा अपयश आले. त्याच्या शारीरिक स्थितीमुळे अनेक नामांकित फर्मने त्याला नकार कळवला. अखेर रौनक शहा यांच्याकडे त्याने कामाला सुरुवात केली.  वकिली क्षेत्रातील धावपळ जपत त्याने ५ वर्ष पुण्यात प्रॅक्टिस केली आणि त्याला न्यायाधीश होण्याच्या इच्छेनं अक्षरशः झपाटले. दररोज काही तास तो अभ्यास करत होता. आजही निखीलला वेगाने लिहिता येत नाही. पेपर लिहिण्यासाठी त्याला मदतनीस लागतो. या परीक्षेत तर दिवसातून दोन पेपर असतात पण अमित देवस्थळे या मित्राच्या साहाय्याने त्याने ८ तास पेपर लिहिला आणि त्याची न्यायाधीशपदी निवड झाली. 

 हा संपूर्ण प्रवास सोपा कधीच नव्हता. अनेक अडचणी आल्या, काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या पण कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने निखील त्यातूनही बाहेर पडला. अनेक जण तोंडावर आजाराविषयी विचारायचे, काहीजण खोचक सवाल करायचे पण सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्याने इथंवर वाटचाल केली आहे. याबाबत तो सांगतो की, 'सामान्य वातावरणात वाढ होणे मला खूप उपयोगी ठरले. माझा मोठा भाऊ सुनील याचीही यात खूप मदत झाली. जर योग्य वयात निदान झाले आणि योग्य उपचार मिळाले तर आजार आटोक्यात राहू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुटुंब, मित्र परिवार आणि समाजाची साथ असेल तर कोणीही दिव्यांग व्यक्ती स्वतःला कमजोर समजणार नाही'. निखीलचा हा संघर्ष प्रेरणादायी तर आहेच पण प्रत्येक खचलेल्या व्यक्तीला नवी उमेद देणाराआहे. 

Web Title: Judge Nikhil Baji inspirational journey overcoming cerebral palsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.