'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:24 PM2021-07-09T21:24:34+5:302021-07-09T21:30:13+5:30
१० वर्षातील दुसर्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद...
विवेक भुसे-
पुणे : मॉन्सून कमकुवत असल्याने आकाशात ढगाचे आच्छादन नाही. त्यामुळे डोक्यावर असलेल्या सूर्यनारायणाची किरणे थेट जमिनीवर येत आहे. त्यामुळे एरवी असलेल्या सरासरी तापमानापेक्षापुणे शहराचे जुलै महिन्यामधील तापमान उच्च राहिले आहे. गेल्या ८ दिवसात ते सरासरीपेक्षा अधिक राहिले असून मागील १० वर्षातील दुसर्या क्रमाकांच्या कमाल तापमानाची नोंद आताच झाली
आहे.
पुणे शहरात एप्रिल महिन्यांचा अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमानाची प्रामुख्याने नोंद होत असते. यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरला नाही. मात्र, पावसाने ओढ दिल्याने जुलै महिन्यातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्याप्रमाणे उकाडा जाणवत आहे. जुलै महिन्यातील आठ दिवसातील कमाल तापमान प्रथमच इतके सलग अधिक राहिले आहे.
जुलै महिन्यातील नोंदविलेले सर्वाधिक कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
५ व ७ जुलै २०२१ - ३३.५
८ जुलै २०१७ - ३१.३
१३ जुलै २०१५ - ३२.२
१ जुलै २०१४ - ३४.४
३ जुलै २०१२ - ३३.४
१ जुलै २००९ - ३३.०
......
जुलै महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान - १२ जुलै १९६६ - ३६.० अंश सेल्सिअस
.........
पुणे शहरात जुलै महिन्यात सरासरी कमाल तापमान २९.३ अंश सेलिसअस इतके असते. पुणे शहरात ५ व ७ जुलै २०२१ रोजी कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले, तसेच पाहिले तर हा उन्हाळ्याचाच महिना असतो. मात्र, या काळात आपल्याकडे मॉन्सून स्थिरावलेला असतो. आकाशात ढगाचे आच्छादन असते. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जुलै महिन्यात आल्हाददायक वातावरण असते. सूर्य २१ जूनला कर्कवृत्तावर असतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याची प्रखरता उत्तरेकडे वाढत जाते. त्यामुळे आपल्याकडे उत्तर भारतात या काळात कमाल तापमान वाढते असते. सध्या अमेरिका, कॅनडामध्ये उष्णतेची लाट आलेली दिसते. तेथे उष्णतेमुळे शेकडोचे बळी गेले आहेत. याचवेळी आपल्याकडे मॉन्सून सक्रीय असल्याने उष्णतेचा परिणाम दक्षिणेकडे होताना दिसत नाही. ऑक्टोबरमध्येही मॉन्सून गेलेला असल्याने आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये उष्णता जाणवते. त्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. सध्या मॉन्सून कमकुवत आहे. आकाशात ढगांचे आच्छादन नाही. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट येतात. सूर्य दुपारी डोक्यावर आल्यानंतर त्याची सर्वाधिक कमाल तापमान २ तासांनी जास्त जाणवते. ही स्थिती या आठवड्यात अशीच राहणार असून मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर कमाल तापमानात घट होईल.
........
सध्या मॉन्सून सक्रिय नसल्याने आकाश निरभ्र आहे. त्यामुळे कर्कवृत्तावर असलेल्या सूर्याची थेट किरणे जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. मॉन्सून सक्रीय झाल्यानंतर पुढील आठवड्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ