जुलैमध्ये धुवाधार ,देशभरात ९७ टक्के पाऊस बरसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:27 AM2018-05-31T06:27:41+5:302018-05-31T06:27:41+5:30
केरळमध्ये वेळेआधी ३ दिवस मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने यंदा देशात ९७ टक्के इतका सर्वसाधारण पाऊस होईल
पुणे : केरळमध्ये वेळेआधी ३ दिवस मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने यंदा देशात ९७ टक्के इतका सर्वसाधारण पाऊस होईल, अशी आनंदवार्ता दिली आहे. संपूर्ण देशात जुलैमध्ये सर्वाधिक १०१ टक्के, तर आॅगस्टमध्ये ९४ टक्के पाऊस बरसेल, असा अंदाज आहे़
हवामान विभागाने १६ एप्रिलला पाऊस सर्वसाधारण होईल, असा अंदाज दिला होता़ बुधवारी दुसरा अंदाज जाहीर केला. पॅसिफिक महासागरातील ला निना हा प्रवाह यंदा अनुकूल आहे़ भारतीय समुद्रातील पाण्याचे तापमानही अनुकूल असून, त्याचा परिणाम चांगल्या पाऊसमानात होणार आहे़
९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता १३ टक्के असून, सरासरीपेक्षा कमी (९० ते ९६ टक्के)ची शक्यता २८ टक्के आहे. सरासरी पावसाची शक्यता ४३ टक्के इतकी सर्वाधिक आहे़ सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता १३ टक्के आहे़
हवामान खात्याच्या दुसऱ्या अंदाजाने शेतकरी, तसेच फलोत्पादन क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.