जम्बो कोविड सेंटर सोमवारपासून पुन्हा रुग्णांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:57+5:302021-03-20T04:11:57+5:30
पुणे : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी भीतीदायक वातावरण नाही. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. वाढत्या ...
पुणे : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी भीतीदायक वातावरण नाही. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून शिवाजीनगरचे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रूग्णांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडू दिल्या जाणार नाहीत. त्याकरिता सोमवारी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आले आहे. रुग्णांचे लवकर निदान व्हावे याकरिता तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी आजवरच्या सर्वाधिक १३ हजार तपासण्या करण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.
गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी गंभीर परिस्थती निर्माण झाली होती, तशी स्थिती सध्या नाही. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या अधिक असून ६५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण गृहविलगिकरणात राहून उपचार घेत आहेत. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व नियम पाळावेत. व्यापारी आस्थापनांनीही घालून दिलेल्या निर्देशानुसार कामकाज करावे. या साथीला अटकाव करण्यासाठी नियम पाळणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले.