आता बोला! पिंपरी चिंचवडच्या जम्बो हाॅस्पिटलमध्ये रुग्ण नसताना ५८ रुग्णांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:23 PM2021-04-27T21:23:16+5:302021-04-27T21:27:09+5:30
प्रशासनाच्या ऑक्सिजन ऑडिटमध्ये हाॅस्पिटल्सचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..
पुणे : जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व खासगी व सरकारी हाॅस्पिटल्सचे ऑक्सिजन ऑडिट सुरू केले असून, यात ऑक्सिजनच्या विना वापराचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवड मधील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये तर 58 रुग्ण संख्याच्या एका ऑक्सिजन वाॅर्डमध्ये एकही रुग्ण नसताना ऑक्सिजन वापर मात्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन्स सोबतच ऑक्सिजनची मागणी देखील मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचा काटेकोर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी प्रायोगिक तत्वावर काही खाजगी व काही सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट केले. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आण्णा साहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये एकही रुग्ण नसताना तब्बल 58 रुग्ण संख्येच्या वाॅर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असताना अशा प्रकारे बेफिकीरपणे वागणा-या ठेकेदारावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
-------
खासगी हाॅस्पिटल्समध्ये अशी होते ऑक्सिजनचा गैरवापर
बहुतेक सर्व लहान - मोठ्या हाॅस्पिटल्समध्ये रुग्णाला
- गरजेपेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा दिला जातो
- रुग्ण बाथरूमला गेल्यानंतर ऑक्सिजन चालुच असतो
- रुग्ण जेवण करत असताना ऑक्सिजन चालुच ठेवला जातो
- अनेक वेळा रात्री रुग्ण ऑक्सिजनचे मशिन बाजुला काढून झोपी जातात
- ऑक्सिजनची फारशी गरज नसलेल्या रुग्णांना देखील ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवणे
-----------
ऑक्सिजन संपल्याच्या बोगस काॅलमुळे प्रशासनाची धावपळ
ऑक्सिजनचा पुरेसा साठा असतानादेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्याकडचा ऑक्सिजन पुरवठा संपल्याचा फोन काॅल जिल्हा प्रशासनाला केला. यामुळे पुण्याकडे निघालेला ऑक्सिजन टॅंकर पिंपरी-चिंचवडकडे वळविण्यात आला.
दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत संबंधित ऑक्सिजन पुरवठादाराला विचारणा केली असता पुरेसा ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याचे सांगितले. तसा सविस्तर तपशील तातडीने व्हाॅटस् ॲप केलं. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदारपणा बद्दल देखील नाराजी व्यक्त होत आहे. विभागीय आयुक्तांना या बद्दलचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.